Take a fresh look at your lifestyle.

सोनू सूद पुन्हा एकदा आला मदतीला ; आता किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यास करणार मदत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | करोना संकटाच्या काळात अभिनेता सोनू सूदने अनेक गरजुंना मदत केली आहे. आतापर्यंत देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना, मजुरांना त्याने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. आता तर तो किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बिहार-झारखंड येथील आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करत आहे. सोनूने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

“किर्गिस्तान येथे अडकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, आता घरी परतण्याची वेळ झाली आहे. बिश्केक ते वाराणसी हे पहिलं चार्टर फ्लाइट २२ जुलै रोजी रवाना होईल. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि मेल आयडीवर काही वेळातच या सगळ्यासंदर्भातील माहिती मिळेल. अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठीदेखील याच आठवड्यात चार्टर फ्लाइटची सोय केली जाईल”, असं ट्विट सोनू सूदने केलं.

दरम्यान, सोनू सूद सातत्याने त्याचं मदतकार्य करत आहे. त्यामुळे विविध स्तरांमधून त्याचं कौतुक करण्यात येत आहे. आतापर्यंत सोनूने अनेकांना त्यांच्या गावी सुखरुपरित्या पाठविलं असून अनेकांच्या जेवणाचीही व्यवस्थादेखील केली आहे.

Comments are closed.