Take a fresh look at your lifestyle.

या मुलांनी माझं मन जिंकलंय..मी निःशब्द झालो; मंजुळेंच्या ‘झुंड’वर साऊथचा धनुष फिदा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट उद्या अर्थात शुक्रवारी ४ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी विविध कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे प्रायव्हेट स्क्रिनिंग झाले. दरम्यान मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. प्रत्येकाने चित्रपटाचं तोंडभर कौतुक केलं आहे. आमिर खानने नागराज मंजुळे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केल्यानंतर आता साऊथमध्येही झुंड चा बोलबाला आहे. कारण दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने ‘झुंड’वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

झुंड चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना साऊथ स्टार धनुष म्हणाला कि, “कुठून सुरुवात करू ते समजत नाहीये. अतिशय अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी हजार शब्द बोलू शकतो, की हे अप्रतिम आहे, ते खूप छान आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जाते. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. हा चित्रपट म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. हा चित्रपट पाहिल्याचा, ती जादू अनुभवल्याचा मला खूप खूप म्हणजे खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी खरंच नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा चित्रपट एखाद्या मास्टरपीसप्रमाणे आहे.

धनुषने नुकताच हा चित्रपट फर्स्ट स्क्रीनिंगला पाहिला. यानंतर त्याने चित्रपटातील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने मन जिंकल अशी भावना व्यक्त केली. दरम्यान “नागराज मंजुळेंचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे”, असे म्हणत धनुषने झुंड चित्रपटाच्या कलाकृतीचे विशेष कौतुक केले. ‘झुंड’ हा नागराज मंजुळे यांचा पहिलाच पण दमदार असा बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट बनवताना त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आल्या पण त्यांनी हे आव्हानदेखील पेललं. यामळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. पण टी सीरिजच्या भूषण कुमार यांनी कथा ऐकल्यानंतर चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आणि मंजुळेंचा झुंड प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असून फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे.