हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. कारणही तसंच आहे. हा चित्रपट त्याच्या शीर्षकातून सारं काही बोलत आहे. एक स्त्री आपल्या माहेराहून सासरी जाते पण या सगळ्यात तीचं अस्तित्व तिचीच माणसं पुसट करत जातात. कालांतराने ती स्वतःचं अस्तित्व विसरू लागते. पण एक स्त्री जे करू शकते ते इतर कुणीच करू शकत नाही. बाईपण भारी आहे म्हणून ते बाईकडे आहे. हे पटवून देणारा आणि स्त्रियांना आयुष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पहायला लावणारा हा चित्रपट सहा बहिणींची गोष्ट घेऊन येतो आहे. हा चित्रपट येत्या ३० जून २०२३ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
या सहा जणी आपल्यापैकीच एक आहेत. प्रत्येक ती स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे. या चित्रपटात प्रेम, माया, जिद्द, ध्येय, तडजोड, दुःख, स्वार्थ अशा अनेक भावनांचे मिश्रण आहे. स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या छटा अन आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करताना तिला, ‘थांब, जरा श्वास घे’ म्हणणारा कुणीच नसतं. तेव्हा तिची तीच असते. हा चित्रपट त्या प्रत्येक स्त्रीच्या कौशल्याला दाद देणारा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणारा आहे. यामध्ये आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा प्रत्येक तीचा समावेश आहे. या चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरत असलं तरी प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.
या चित्रपटात ज्या सहा बहिणी आहेत त्या काही कारणांमुळे विभक्त झाल्या आहेत आणि स्वतःच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड देत आहेत. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सर्वोच्च पातळीवर कार्यरत आहेत. मात्र त्यांचा पुरस्कार होत नाही. कळत नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. हा चित्रपट अशाच स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतोय. चित्रपटाबद्दल केदार शिंदे म्हणाले की, ‘आपल्याकडे विविध विषयांवर सिनेमे बनवले जातात पण बायकांच्या मनाचा किंवा भावनांचा विचार क्वचितच केला जातो. तोच विचार मी अगं बाई अरेच्चा करताना केला आणि आता बाईपण भारी देवा मध्ये यातील पुढच्या टप्प्याचा विचार करून, प्रत्येक स्त्रीला तिची कथा बघतेय किंवा ही तर मीच आहे असा फील देणारी ही फिल्म आहे. बाईपण भारी देवा सिनेमात अभिनेत्रींची फौजच आहे. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब-चौधरी यांच्या भूमिका आहेत. स्त्रीची विविध रूपं, त्यांची नाती हे सगळं सिनेमात आहे’.
Discussion about this post