राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; या अभिनेत्रींनी मिळवला सन्मान
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे रविवारी दिनांक २७ जून २०२१ रोजी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. या दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाढ यांसह धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याबाबत व्यक्त होताना हास्यकलाकार अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. नेहमीच आपल्या दिसण्यापेक्षा आपल्यामुळे हसणाऱ्यांना प्राधान्य देत त्यांनी निखळ अभिनयातून आपली शैली दर्शविली आहे. यामुळे नेहमीच सर्वांची लाडकी हास्यकलाकार म्हणून त्यांची ओळख राहिली आहे.
अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, प्रचंड आनंद … आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. मलबार हिल राजभवनला जाण्याचा योग आला. लेकाला बरोबर घेऊन गेले होते, नेमकं महेशला काम होतं अन्यथा तो ही असता..! आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. “आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पाहिल आणि भरून आलं…”
नवरा फोनवरून सतत संपर्कात तो ही जाम खुश, सासूबाई, जाऊबाई, आत्याबाई, नणंद बाई, भावंड, सगळ्यां सगळ्यांचे कौतुकाचे फोन, मेसेजेस, मित्र मैत्रिणीचे फोन… शुभेच्छा वर्षाव… खूप खूप शब्दांत न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय… मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांचं, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्तचे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या देवाचे आभार…!
हा पुरस्कार मला माझ्या कामासाठी मिळालाय आणि त्याकरिता काही मंडळी अतिशय महत्वाची आहेत ज्यांच्याशिवाय माझं काम अधुरं राहील असतं. आमची टीम “हास्यजत्रा “सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे, माझा पार्टनर, मित्र समीर चौघुले आणि प्रसाद खांडकेकर, नम्रता योगेश संभेराव, पॅडी कांबळे आणि सोनी मराठीचे मनापासून आभार. असे लिहून अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.