‘स्ट्रगलर साला 3’ येतोय; पुन्हा होणार चावटपणा आणि पुन्हा होणार शिव्यांची बरसात
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शक विजू माने आणि अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण यांची धमाल मस्ती ‘स्ट्रगलर साला’ या मराठी यु ट्यूब सिरीजमधून सगळ्यांनी अनुभवली. तरुणाईला भावणारी भाषा, धुवाँधार शिव्या, चावट शैली आणि हिडीस पीडीस कथानक असा बाज असलेली हि वेब सिरीज तरुणांमध्ये फारच लोकप्रिय आहे. आतापर्यंत या सीरिजचे २ सीजन गाजल्यानंतर तिसरा सीजन लवकरच येत आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.
स्ट्रगलर सालाचे दोन्ही सीजन भरपूर गाजले आहेत. त्यामुळे आधीच तिसरा सीजन कधी येणार..? अशी उत्सुकता होती. यानंतर अखेर तिसरा सीजन येणार अशी दिग्दर्शकांनी घोषणा केली आणि चाहत्यांमध्ये आनंद पसरला. अभिनेता संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, विजू माने यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक लाईव्ह करत ‘स्ट्रगलर साला ३’ लवकरच रिलीज होणार अशी घोषणा केली आहे. या लाइव्हमध्ये चाहत्यांनी भन्नाट प्रश्नांचा भडीमार केला आहे. शूटटू म्हणजे काय..? बाबाचा पाव भाजीचा भाग दाखवा.. तसेच शिवाय भूत स्पेशल भागाचीही भन्नाट चर्चा रंगली.
‘या सिरिज मधली भाषा अश्लील नाही तर ही मित्रांची भाषा आहे. एकंदर चार मित्र एकमेकांशी ज्या भाषेत बोलतात त्याच भाषेत आम्ही बोलतो. स्क्रिप्ट मध्ये कधीही शिव्या नसतात, त्या चित्रीकरणादरम्यान ओघाने येतात,’ असं कुशल यावेळी म्हणाला. यानंतर चाहत्यांनी शिव्या वाढवा असे म्हटले. येत्या पर्वात प्रत्येक भागात नवीन कलाकार, नवीन घटना येतील अशी माहिती विजु माने यांनी दिली. यावेळी लाईव्ह साठी अभिनेता अभिजीत चव्हाण म्हणजेच बाबा उपस्थित नव्हता. काही अपरिहार्य कारणामुळे तो गावी गेला असल्याचे यावेळी समजले. पण सध्या तरी नवाकोरा भारी सीजन येणार इतकंच चाहत्यांसाठी बस आहे.