हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत जवळपास ३५ पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे. याच दरम्यान आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच गरज पडल्यास करण जोहर आणि त्याच्या मॅनेजरची देखील चौकशी केली जाईल,” अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर महेश भट्ट आणि करण जोहर यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. ते घराणेशाहीला दुजोरा देत असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. मात्र, आता या प्रकरणात महेश भट्ट यांचीच चौकशी होणार आहे. तसेत अनिल देशमुख यांनी गरज पडल्यास करण जोहरची देखील चौकशी करण्यात येईल असे म्हटले आहे. यापूर्वी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, संजय लीला भन्साळी, चित्रपट समीक्षक राजीव मसंद अशा अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती.