Take a fresh look at your lifestyle.

स्वप्नांच्या आकाशात स्वछंदी भरारी घेणारी ‘अनन्या’; पहा टिझर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत गेल्या काही काळापासून एकपेक्षा एक हटके असे चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. प्रत्येक प्रवर्गातून येणारे हे चित्रपट जगण्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देत आहेत. अगदी ऐतिहासिक चित्रपटांपासून ते प्रेरणात्मक चित्रपटांमधून अनेक निर्माते आणि दिग्दर्शक प्रेक्षकांचे मन प्रफुल्लित करीत आहेत. यापैकीच एक दिग्दर्शक म्हणजे प्रताप फड. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ‘अनन्या’ या चित्रपटाची चर्चा सुरु होती. अखेर या चित्रपटाचा टिझर रिलीज झालाय. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मिती ‘अनन्या’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनीच सांभाळली आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मिती केली आहे.

प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ या चित्रपटाचे पोस्टर महिला दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरमधून या चित्रपटात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारणार आहे हे समजले. यानंतर नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली. त्याप्रमाणे येत्या २२ जुलै २०२२ रोजी ‘अनन्या’ हा सकारात्मक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी आज या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये आपल्या स्वप्नांच्या आकाशात स्वछंद भरारी घेणारी अनन्या आणि तिच्या आयुष्यातील तो प्रसंग ज्याने तिला पाडण्याचा प्रयत्न केला त्याची झलक दाखवण्यात अली आहे. पण याचसोबत परिस्थितीवर मात करून अनन्य चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे कशी लखाकली तेही यात दाखविले आहे.

‘अनन्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड आपल्या चित्रपटाविषयी बोलताना आणि भावना व्यक्त करताना म्हणाले कि, “या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’