Take a fresh look at your lifestyle.

प्रेमाची दौलत उधळणाऱ्या ‘मजनू’चा टिझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक मराठी बहारदार चित्रपट येत आहेत. विविध धाटणीच्या विविध कथानकांच्या माध्यमातून मराठी विश्वात विविध विषय मांडले जात आहेत. या कथानकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. यानंतर आता सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ‘मजनू’ चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च झाला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हा ट्रॅफिक डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला निर्माते गोवर्धन दोलताडे, भारत चंगेडे, डॉ. दीपाली गर्जे-सानप यांच्यासह दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, चित्रपटातील कलाकार सुरेश विश्वकर्मा, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे व तंत्रज्ञ उपस्थित होते.

या टीझरमध्ये एक नवी कोरी जोडी पाहायला मिळते आहे. रोहन पाटील आणि स्वेतलाना अहिरे यांची केमिस्ट्री यामध्ये पहायला मिळेल. टीझरमध्ये हे युगल एकमेकांशी प्रेमळ संवाद साधत आहेत. “माझ्यासाठी तूच सोनं, नाणं, हिरे, मोती, धन दौलत …” अशा संवादाने हा टिझर सुरु होतो. या टीझरमुळे “मजनू” हा चित्रपट एक तरल प्रेमकहाणी असेल असे स्पष्ट होत आहे. या चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आपल्या आगामी चित्रपटाबद्दल अर्थात ‘मजनू’ बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, “शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्या नंतर तेथील बंधमुक्त आणि मौजमजेच्या वातावरणात वावरताना प्रत्येक युवक हा स्वतःला मजनू समजू लागतो मग ते शहर असो की गाव. प्रेमाची खरी ओळख सर्व तरुण, तरुणींना याच काळात होते, त्यांच्या या भावविश्वावर आधारित ‘मजनू’ हा चित्रपट फक्त प्रेमकहाणी नसून एक परिपूर्ण पॅकेज आहे. ‘मजनू’ मध्ये प्रेम, संघर्ष, सस्पेन्स, विरह यांसारखे अजूनही विविध पैलू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत, तसेच चित्रपटातील गाणी श्रवणीय असून ती प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच भुरळ घालतील.”