Take a fresh look at your lifestyle.

RaanBaazaar: आधी पहा, समजून घ्या, मग टीका करा; आयेशाला ट्रोल करणाऱ्यांना तेजूने दिले प्रत्युत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| प्लॅनेट मराठी ओटीटीवर ‘रानबाजार’ ही सीरिज अलीकडेच २० मे २०२२ पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही वेब सीरिज सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये राजकारण, धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार अस सगळंच पहायला मिळतंय. या वेब सीरिजच्या ट्रेलर नंतर सोशल मीडियावर आयेशा आणि रत्ना चांगल्याच ट्रोल झाल्या. या दोघी म्हणजे अनुक्रमे तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी. त्यांची बोल्ड सीन्स प्रेक्षकांना अपेक्षित नव्हते आणि त्यामुळे हे ट्रोलिंग टोकाचं होताना दिसल. यावरून आता तेजस्विनी पंडित हिने आपले मत व्यक्त केले आहे.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली, “मी या सीरिजमध्ये आयेशाची भूमिका साकारतेय. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी आहे. या सीरिजच्या टीझर आणि ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. टीझरमध्ये माझा बोल्ड अंदाज पाहून अनेकांना धक्का बसला. पण सुदैवाने मला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी मी, प्राजक्ता आणि दिग्दर्शक अभिजीत आम्ही मिळून काही देहविक्री करणाऱ्या महिलांची भेट घेतली. त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्यासारखा बिनधास्त अंदाज भूमिकेत उतरविण्याचा प्रयत्न केला.”

सीरिजमधील बोल्ड भूमिकेवरून तेजस्विनी आणि प्राजक्तावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या. याबद्दल प्रतिक्रिया देताना तेजस्विनी म्हणाली, “होय, मी सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचा स्वीकार करण्यास तयार आहे. मी सर्व प्रेक्षकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही आधी वेब सीरिज पहा, त्याचा विषय समजून घ्या आणि त्यानंतर आमच्यावर टीका करा. लोकांनी आता त्यांचा दृष्टीकोन बदलण्याची खूप गरज आहे. हिंदीतील बोल्ड वेब सीरिजवर कौतुकाचा वर्षाव होतो, पण मराठीत असं काही पाहिल्यावर त्यांची मानसिकता बदलते. आपल्याला हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे.”

या वेब सीरिजमधील आयेशा हे पात्र साकारताना आपल्याला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा होता असेही तेजस्विनी म्हणाली. तिने व्यक्त होत सांगितले की, “माझ्या या प्रवासात मला माझ्या संपूर्ण परिवाराने खूप मोलाची साथ दिली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला आणखी चांगलं काम करण्याची इच्छा होते त्यामुळे कुटुंबाची साथ महत्वाची”, असंही ती बोलताना म्हणाली. ‘रानबाजार’मध्ये तेजस्विनी आणि प्राजक्तासोबतच उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे आणि अभिजीत पानसे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.