Take a fresh look at your lifestyle.

काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा..; राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडल्यामुळे अभिनेत्याची मालिकेतून हकालपट्टी?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका सृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या उत्तम अभिनयासोबतच ते राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर परखड मत मांडताना दिसतात. ज्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयाच्या मुळापासून त्याबाबत सविस्तर लिहिले जणू त्यांचा छंद आहे. पण कदाचित याचमुळे का काय? त्यांच्या पोटावर लाथ आणि कामावर गदा आली आहे. राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडणे त्यांच्या अंगलट आलेय असे वाटू लागले आहे. याचे कारण म्हणजे किरण सध्या स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या प्रसिद्ध मालिकेत काम करत होते. मात्र त्यांना अचानक मालिकेतून बाहेर करण्यात आले आहे. यानंतर मानेंनी आपल्या राजकीय भूमिकांमुळेच मालिकेतून अचानक बाहेर काढण्यात आले असा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट देखील लिहिली आहे.

अभिनेता किरण माने हे फेसबुकवर सतत सक्रिय असल्याचे दिसून येते. त्यांची प्रत्येक पोस्ट व्हायरल होते आणि चांगलीच चर्चेत येते. यानंतर मालिकेतून अचानक बाहेर काढल्यानंतर आता त्यांनी जी पोस्ट केली आहे ती अत्यंत सूचक, मारक आणि लक्षवेधी ठरतेय. किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘काट लो जुबान, आंसूओसे गाऊंगा… गाड दो, बीज हूँ मै, पेड बनही जाऊंगा!!! किरण यांच्या या फेसबुक पोस्टवर सध्या चाहते अफाट समर्थनार्थ प्रतिक्रिया देत आहेत. मात्र काही प्रतिक्रियांमधून त्यांच्यावर टीकाही होत आहेत. याबाबत अद्याप चॅनेलकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

संदर्भात आपला संताप व्यक्त करीत किरण माने म्हणाले की, मला मालिकेतून बाहेर काढण्यासाठी स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं गेलं. महाराष्ट्रात असं होणार नाही, असं मला वाटत होतं. मात्र माझ्याबाबतीत असं घडलं. मी बळी पडलो आहे. हा अभिनय क्षेत्रात माझा झालेला खून आहे. ही बाब मी जीवनभर लक्षात ठेवीन. अभिनेता किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत वडिलांची भूमिका करत होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीची होती मात्र तरीही त्यांना अचानक मालिकेतून काढून टाकण्यात आले. हि बाब नक्कीच आश्चर्यचकित करणारी आहे. त्यामुळे मालिकेचे प्रेक्षकदेखील खवळले असून सोशल मीडियावर किरण मानेंना समर्थन देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.