Take a fresh look at your lifestyle.

आयुष्मान झाला डॉक्टर; आगामी चित्रपटातील पहिला लुक आउट – पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा ‘डॉक्टर जी’ हा आगामी चित्रपट असून त्यामध्ये बॉलिवूड आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुराना एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासह अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाहदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यानंतर निर्मात्यांनी आयुष्मानचा या चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘फर्स्ट लुक’ सादर केला आहे. या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आयुष्मान एका डॉक्टर कथा पात्राचे रील जीवन जगणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना ‘डॉक्टर जी’ या चित्रपटामध्ये डॉ उदय गुप्ता यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आयुष्मानने नुकत्याच सुरू झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत अत्यंत उत्सुक असल्याची भावना माध्यमांसोबत व्यक्त केली. दरम्यान तो म्हणाला की, ‘डॉक्टर जी’चा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत, आम्ही सर्वजण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची वाट बघत होतो, आणि आम्हाला याचा आनंद आहे की तो दिवस अखेरीस उगवला. स्क्रीनवर पहिल्यांदाच एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चित्रीकरणासाठी खरोखरच खूप उत्साहित आहे, कारण यामुळे मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची आणि होस्टेल लाइफ जगण्याची आणि त्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.

अभिनेता आयुष्मान खुराना याने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘बरेली की बर्फी’ आणि ‘बधाई हो’ सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर ‘डॉक्टर जी’ हा जंगली पिक्चर्ससोबत आयुष्मानचा सलग तीसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. अनुभूति कश्यपद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांच्या लेखणीतून लिहिण्यात आलेला एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे.