Take a fresh look at your lifestyle.

बहुप्रतिक्षित चित्रपट RRR ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील असा एकही चित्रपट नाही जो हिट नाही. शिवाय तो चित्रपट जितक्या विविध भाषेंमध्ये प्रदर्शित होतो तितक्या प्रत्येक भाषेत तो हिट होताना दिसतो. उदाहरण द्यायचं झालच तर अलीकडे प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना वेड लावणारा ‘पुष्पा- द राईज’ तुम्हालाही ठाऊक असेलच. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस असा गाजवला कि बस्स. यानंतर आता एसएस राजामौली यांचा बहुप्रतीक्षित आणि तितकाच चर्चेत असलेला चित्रपट ‘आरआरआर’ (RRR)ची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. मार्चमध्ये हा चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालायला प्रदर्शित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर'(RRR) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. हा चित्रपट येत्या २५ मार्च २०२२ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या डिजिटल भागीदारांची घोषणा आधीच केली होती.

ज्यात, ‘चित्रपटाचे डिजिटल प्रवाहातील भागीदार झी ५ तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड आहेत असे सांगितले होते. याशिवाय नेटफ्लिक्स हिंदी याचाही समावेश यात आहे. झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियननेट मल्याळम, स्टार कन्नड हे सॅटेलाईट भागीदार आहेत. डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर (परदेशी भाषा) देखील नेटफ्लिक्स (इंग्लिश, कोरियन, टर्किश और स्पॅनिश) असणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची झिंग काही औरच असते. त्यामुळे नेहमीच प्रेक्षकांना आगामी चित्रपटांची प्रतीक्षा असते. आरआरआर हा चित्रपट गेल्या कितीतरी महिन्यांपासून चर्चेत आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांसोबत बॉलिवूड इंडस्ट्रीमधील काही कलाकार देखील दिसत असल्यामुळे प्रेक्षकांची आतुरता आणखीच वाढली आहे. ‘बाहुबली’च्या वेळी जी जादू आपल्याला पाहायला मिळाली होती तीच जादू आता आरआरआर’च्या माध्यमातून पुन्हा एकदा चित्रपटगृहांवर पहायला मिळणार आहे, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत.