Take a fresh look at your lifestyle.

पॅट्रिऑटिक चित्रपट ‘भारत माझा देश आहे’ ‘या’ दिवशी होणार रिलीज; पहा पोस्टर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाच्या हटके टॅगलाईनने मनोरंजन सृष्टीत एकच हवा करून ठेवली होती. हि टॅगलाईन होती ‘अहिंसा परमो धर्म:’. यानंतर आता ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. सोबतच या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टरदेखील रिलीज झाले आहे. हा चित्रपट त्याच्या शीर्षकातूनच सिद्ध करतोय कि हा एक पॅट्रिऑटिक अर्थात देशभक्तीवर आधारित चित्रपट आहे. ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांची आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा आणि संवाद आहेत. याशिवाय चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लाभले आहे आणि अश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे. सोबतच निलेश गावंड यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. तर चित्रपटाचे छायांकन नागराज यांनी केले आहे.

एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ. आशिष अग्रवाल निर्मित ‘ भारत माझा देश आहे’ हा पॅट्रिऑटिक चित्रपट येत्या ६ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे बालकलाकार दिसत आहेत. तर त्यांच्यामध्ये एक बकरीही दिसत आहे. आता ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचा पोस्टरमध्ये दिसणाऱ्या बकरीशी काय बरं संबंध असेल..? असा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचे उत्तर हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल. या चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम आणि हेमांगी कवी या कलाकारांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत.

‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले कि, ‘हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे, मात्र या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे. आतापर्यंत क्वचितच असा विषय या पद्धतीच्या चित्रपटांमध्ये हाताळला गेला असेल. या चित्रपटात अनेक प्रसंग हसवत हसवत, नकळत खूप गोष्टी सांगून जातात, मनाला स्पर्शून जातात. हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रत्येक लहान मुलाने आवर्जून पाहावा, असा हा ‘भारत माझा देश आहे. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय अतिशय दमदार असून प्रत्येकाने आपली व्यक्तरेखा उत्तम साकारली आहे. हा चित्रपट एक सकारात्मक दिशा देणारा आहे.”