हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी शासनाच्या नियमांची पायमल्ली करीत सातारा जिल्ह्यातील बावधन येथे बगाड यात्रा पार पडली. परिणामी कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्यामुळे प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. बावधनच्या बगाड यात्रेदरम्यान मोठी गर्दी झाली होती आणि मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कडक कारवाई देखील केली होती. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेत सर्व मालिकांचे चित्रिकरणही थांबविण्यात आले आहे. आई माझी काळूबाई, देवमाणूस, घेतला वसा टाकू नको या मालिकांचे साताऱ्यात सुरु असलेले शूटिंग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रपट, लघुपट, वेब सीरिज आणि इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणास परवागनी दिली होती. मात्र आता ते सर्व प्रकारचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. यापुढे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या चित्रपट, लघुपट, वेब सीरिज आणि इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणावर पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस, घेतला वसा टाकू नको तर सोनी मराठी वाहिनीवरील आई माझी काळूबाई आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकांचे शूटिंग साताऱ्यात विविध ठिकाणी सुरू होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता हे शूटिंग बंद करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या सेटवरील ४० जणांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हासुद्धा मालिकेची शूटिंग बंद करावे लागले होते. दरम्यान मालिकेत भूमिका साकारणाऱ्या आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.