Take a fresh look at your lifestyle.

‘ती परत आलीये’ मालिकेच्या प्रोमोतील बाहुलीचा थरार; भीतीदायक अनुभवांनी प्रेक्षकवर्ग बेजार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर अगदी अलीकडेच ‘देवमाणूस’ हि मालिका संपल्यानंतर ‘ती परत आलीये’ हि मालिका भेटीला आली आहे. याप्रमाणे काही दिवसांपूर्वी अग्गंबाई सूनबाई ही मालिका देखील बंद करण्यात आली असून तिच्याजागी दुसरी मालिका देखील सुरू होणार आहे. झी मराठीने एका मागे एक अश्या नव्या मालिकांचा सपाटा लावला असताना प्रेक्षक मात्र ती परत आलीये या मालिकेबाबत अत्यंत उत्सुक होते. कारण ती परत आलीये या मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून मालिकेतील ‘ती’ कोण? या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली होती. यानंतर मालिका सुरु झाली पण प्रोमोमध्ये दाखवलेली बाहुली पाहून प्रेक्षकांची जणू झोपच उडाली.

‘देवमाणूस’ मालिका सुरू असतानाच ‘ती परत आलीये’ या मालिकेचे प्रोमो सुरू झाले होते. हे प्रोमो अतिशय भीतीदायक आणि उत्सुकता ताणणारे होते. परंतु काही काळानंतर त्याला प्रेक्षकांनी विरोध केला होता. निश्चितच वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रोमोची जोरदार चर्चा सुरू असते. परंतु प्रोमोत सर्वप्रथम दोन भयानक डोळे दाखविण्यात आले होते आणि त्यानंतर तिचे ओठ दाखवण्यात आले होते. मागे वाजणाऱ्या भीतीदायक पार्श्वसंगीतासह जेव्हा तिचा संपूर्ण चेहरा दाखवला तेव्हा शेवटी ती एक बाहुली असल्याचे जाणवते. पण, ही बाहुली पहायला अत्यंत भयावह आणि धडकी भरवणारी आहे. तिला पाहिल्यावर असे वाटते जणू तिच्यात जीव आहे.

प्रोमोमध्ये दाखवलेल्या बाहुलीत इतका जिवंतपणा आहे कि तिला पाहिल्यानंतर कोणताही माणूस बिथरेल. तिचे मोठी बुबुळे असलेले डोळे आणि भयानक रेखीव हास्य पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरणे फार साहजिक आहे. इतकेच नव्हे तर, हे प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी त्यांना भीतीचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या प्रोमोमधील बाहुलीची तुलना ‘एनाबेल’ सोबत केली आहे. त्यामुळे आता या मालिकेला प्रेक्षकांचा विरोध होत असल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.