Take a fresh look at your lifestyle.

‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटाचे शीर्षक बदलले; अभिनेता कार्तिक आर्यनने ट्विटरवर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता कार्तिक आर्यन याने अलीकडेच ‘सत्यनारायण की कथा’ या त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची सूत्र निर्माता साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या हाती सुपूर्त करण्यात आली आहेत. मात्र या चित्रपटाची घोषणा होताच एका वादाला उभारी आली. हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या नावावरच थेट आक्षेप घेत या विरोधात मोर्चा उघडला होता. यानंतर अखेर आता या चित्रपटाचे नाव बदलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भोपाळमध्ये ‘संस्कृती बचाओ मंच’ या हिंदू संघटनेने चित्रपटाच्या शीर्षकास विरोध करत, साजिद नाडियाडवाला भोपाळमध्ये आला तर त्याचे तोंड काळे करून गाढवावर मिरवणूक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता या चित्रपटात मुख्य भूमिकेतील कार्तिक आर्यनने चित्रपटाचे नाव बदलण्यात आल्याची माहिती दिली आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे ट्वीट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे. ‘कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही आगामी चित्रपट ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या नावामुळे कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. निर्मात्यांनी आणि क्रिएटीव्ह टीमने यासाठी पाठींबा दिला आहे. या चित्रपटाच्या नव्या नवाची घोषणा लवकरच करण्यात येईल,’ असे समीर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘सत्यनारायण की कथा’ हा एक रोमॅन्टिक आणि म्युझिकल चित्रपट आहे. शिवाय साजिद नाडियाडवाला सोबत कार्तिक आर्यनचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. हा चित्रपट २०२२ सालामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्थात चित्रपटाच्या नावावरून झालेला वाद बॉलिवूडसाठी फारसा काही नवा नाही नसला तरी लवकर मिटणारा बहुतेक हा पहिलाच वाद असेल. याआधीही अनेक वादांच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपटांच्या नावात बदल करण्यात आला होता. इतकंच काय तर गतवर्षी, अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या नावावरही मोठा वाद झाला होता. शिवाय सैफ अली खानची ‘तांडव’ या वेबसीरिज सुद्धा यामुळेच वादात होती.