हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । चीनमधून कोरोना विषाणूचा उगम झाला आहे हे आता संपूर्ण जगाला माहित झाले आहे. मात्र चीनने अद्याप पुरेशी माहिती दिलेली नाही आहे. चीन माहिती देण्यास उशीर करत असल्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम चीनमध्ये जाणार आहे. चीनमधील जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने तेथील व्हायरल निमोनियाच्या प्रकरणाबद्दल वुहान नगरपालिका आरोग्य आयोगाकडून निवेदन घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर ही भेट होणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस यांनी जानेवारी मध्ये चीनसोबत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची टीम पाठविण्यासंदर्भात सांगितले होते. सध्या कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत जगभरातील ५ लाखांपेक्षा अधिक लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या चिफ सौम्या स्वामिनाथन यांनी एका मुलाखतीत या विषाणूचे उगम शोधण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
३१ डिसेंबर रोजी चीनमध्ये व्हायरल निमोनियाच्या प्रकरणांची नोंद झाली होती. कोरोना विषाणू हा वटवाघुळाच्या विषाणूशी खूप मिळताजुळता असल्याचे स्वामिनाथन यांनी सांगितले आहे. २९ जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक चीनच्या शी झिनपिंग यांच्याशी आंतरराष्ट्रीय टीम पाठविण्यासंदर्भात बोलले होते. आता पुढच्या आठवड्यात ही टीम चीनमध्ये जाणार आहे.