Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारकडून नाट्यकर्मींना दिलासा; राज्यातील नाट्यगृहे ५ नोव्हेंबरपासून खुली होणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता गतवर्षापासून संपूर्ण राज्यभरात कडक नियमावलीच्या साखळ्या घालण्यात आल्या. यात प्रामुख्याने मॉल्स, प्रार्थनास्थळे, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे अश्या गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लावून तळे लावण्यात आले. यामुळे गतवर्षापासून संबंधित व्यापारी आणि कलाकारांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे राज्यातील सर्व नाट्यगृहे बंद असल्यामुळे दररोजच्या हजेरीवर काम करणाऱ्या नाट्यकर्मींच्या पोटाला चिमटा लागला. यामुळे ठाकरे सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात टीका आणि आंदोलने करण्यात आली. यावरून अनेक दिग्गज कलाकारांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरते पाहून हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्सवरील काही निर्बंध शिथिल करीत ते सुरु करण्याचा निर्णय दिला. मात्र, नाट्यगृहे उघडण्यास परवानगी दिली नव्हती. पण अखेर आता ५ नोव्हेंबर २०२१ अर्थात अवघ्या दिवाळीच्या दिवसांत राज्यातील सर्व नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नाट्यकर्मींना दिलासा मिळाला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी शुक्रवारी अर्थात ३ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात यावी यासंदर्भात बोलण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे ५ नोव्हेंबर २०२१पासून ५०% क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश संबंधित शासकीय अधिकारी आणि विभागांना देण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे हे मान्यवर उपस्थित होते. तर हि भेट घडवून आणण्यासाठी आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी प्रयत्न केले होते.

दरम्यान, रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्राचे प्रतिनिधी विजय राणे यांनी रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्र राज्य निवेदनातील मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर महाराष्ट्रातील लोककलावंताना कला सादरीकरणासाठी कोरोना नियमावलीचे पालन करण्यासंबंधीत सुधारीत नियमावली तयार करून परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय रंगकर्मीच्या मुलांना फी न भरल्यामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांची यादी लवकर देण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान रंगकर्मी रोजगार हमी योजनेसंदर्भात विजय राणे यांनी रंगकर्मींच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.