Take a fresh look at your lifestyle.

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर बायोपिक चित्रपट होणार; फराह खानच्या हाती दिग्दर्शनाची सूत्रे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्री गाजवणारे अनेक अभिनेते होऊन गेले तर अनेक अभिनेते अद्याप इंडस्ट्री गाजवताना दिसत आहेत. यांपैकी एक सुपरस्टार राजेश खन्ना. ‘आखरी खत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि १९६९- ७१ या ३ वर्षांत सलग १७ सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यांचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. अश्या कलाकाराचे १८ जुलै २०१२ साली कर्करोगामुळे निधन झाले. मात्र त्यांच्या अभिनित चित्रपटांचे वेड अद्याप इंडस्ट्रीवर आणि चाहत्यांवर कायम आहे. त्यांना २०१३ साली ‘मरणोत्तर पद्मभूषण’ देण्यात आला होता. यानंतर आता लवकरच राजेश खन्ना यांच्या जीवनप्रवासावर बायोपिकची निर्मिती होणार आहे. तर माहितीनुसार या बायोपिकचे दिग्दर्शन बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शिका फराह खान करणार आहे.

येत्या बुधवारी राजेश खन्ना यांची ७९वी जयंती आहे. याच दिवसाचे औचित्य साधून निर्माते निखिल द्विवेदी यांनी या बायोपिकची घोषणा केली आहे. मात्र यानंतर आता उत्सुकता अशी कि, फराह खान दिग्दर्शित या बायोपिक चित्रपटात दिवंगत अभिनेता राजेश खन्ना यांची भूमिका नेमकं कोण साकारणार? आतापर्यंत या बायोपिकविषयी फार काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र लवकरच कथा स्वरूप आणि कलाकारांची माहिती अधुकृतपणे जाहीर केली जाईल अशी आशा आहे.

लेखक गौतम चिंतामणी यांच्या बेस्ट सेलिंग ‘डार्क स्टार: द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकाचे हक्क निर्माते निखिल द्विवेदी यांनी विकत घेतले आहेत. यानंतर निखिल द्विवेदी यांनी माध्यमांना सांगितले कि, ”गौतम चिंतामणी यांच्या ‘डार्क स्टार’ या पुस्तकाचे हक्क आम्ही विकत घेतले आहेत. हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक फराह खानसोबत माझी चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी या बायोपिकबद्दल मी एवढीच माहिती देऊ शकतो. राजेश खन्ना यांचे चरित्र मोठय़ा पडद्यावर आणण्यासाठी मी स्वतः उत्सुक आहे.”