Take a fresh look at your lifestyle.

हे अत्यंत अपमानास्पद आहे.. ; ‘दसवी’ च्या रिव्ह्यूवर यामीची संतप्त प्रतिक्रिया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला दसवी हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. एकीकडे विविध स्तरावरील समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत तर दुसरीकडे प्रेक्षकांकडूनही तशीच काहीशी प्रतिक्रिया येत आहे. अशातच अभिनेत्री यामीने चित्रपटाच्या एका रिव्ह्यूवरून आपला संताप व्यक्त केला आहे. ‘फिल्म कम्पॅनियन’च्या रिव्ह्यूवर यामी संतापली आहे. या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट तिने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘यामी गौतम आता हिंदी चित्रपटातील मृत गर्लफ्रेंड राहिलेली नाही, परंतु तिचं संघर्षपूर्ण हास्य सतत रिपिट होऊ लागलंय’, असं लिहिलं आहे. हे वाचून यामी संतापली आणि तिने हे अपमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना यामीने लिहिले आहे कि, मी आणखी काही बोलण्यापूर्वी, मला हे स्पष्ट करायचं आहे की मी सहसा टीकेत काही तथ्य असेल तर ते मान्य करते. पण जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला सतत खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मला त्याबद्दल बोलणं आवश्यक वाटतं. माझ्या अलीकडील चित्रपट आणि परफॉर्मन्सेसमध्ये अ थर्स्ट डे, बाला, उरी इत्यादींचा समावेश आहे आणि तरीही हा माझ्या कामाचं रिव्ह्यू समजला जातो. हे अत्यंत अपमानास्पद आहे.’

पुढे, ‘प्रत्येक संधीनुसार आपली क्षमता पुन्हा पुन्हा सिद्ध करत राहण्यासाठी कोणासाठीही आणि विशेषत: माझ्यासारख्या सेल्फमेड अभिनेत्रीसाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घ्यावे लागतात. मात्र काही नामांकित पोर्टल्समधून हे असं वाचायला मिळतं. हे मन दुखावणारं आहे कारण इतर बऱ्याच जणांप्रमाणे मीसुद्धा फिल्म कम्पॅनियनला वाचायचे, पहायचे. परंतु आता यापुढे ते मी करेन असं मला वाटत नाही. मी तुम्हाला विनंती करते की यापुढे माझ्या कामाचा रिव्ह्यू लिहू नका. ते माझ्यासाठी कमी वेदनादायक असेल’,.