Take a fresh look at your lifestyle.

‘ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक’; रणदीप हुडा साकारणार वीर सावरकरांची भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा हा महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट एक बायोपिक चित्रपट असून याचे जूनपासून शूटिंग सुरू होत आहे. महाराष्ट्रासह अगदी लंडन आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग होईल. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटात आपण मुख्य भूमिका करणार याचा आनंद रणदीपने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत व्यक्त केला आहे. दरम्यान ‘कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती है’ (काही कथा सांगितल्या जातात तर काही जगल्या जातात) असं कॅप्शन देत रणदीपने हा फोटो शेअर केला आहे.

हा चित्रपट एक स्वप्नपूर्ती असल्याचे सांगताना निर्माते संदीप सिंग, आनंद पंडित आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खूप विचारानिशी वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान निर्माते संदीप सिंग म्हणाले कि, ‘भारतात असे फार कमी कलाकार आहेत, जे त्यांच्या प्रतिभेने पडद्यावर एक वेगळी छाप सोडू शकतात आणि रणदीप त्यापैकीच एक आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी माझ्या डोक्यात सर्वांत आधी रणदीपचाच विचार आला. वीर सावरकरांचं योगदान दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही.’ तर प्रेक्षकांसाठी हा एक अविस्मरणीय चित्रपट असेल, अशी आशा आनंद पंडित यांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले कि, ‘आपण ज्या कथांकडे दुर्लक्ष केलं होतं, ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. हा चित्रपट आपल्याला पुन्हा एकदा इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल विचार करायला भाग पाडेल. रिसर्च टीमसोबत आम्ही जवळपास वर्षभरापासून या विषयावर काम करत आहोत.’ तर चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना अभिनेता रणदीप हुडा म्हणाला कि, ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं. त्यांची कथा ही जगासमोर आणायलाच हवी. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल.’