हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रंगभूमी माझे कर्म, रंगभूमी माझा धर्म’.. अशा ब्रीदाशी नेहमीच एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीला आपण कलावंत म्हणून ओळखतो. गेल्या कित्येक वर्षांपासून रंगभूमीचा मान आणि तिचे स्थान जपणारे हे कलाकार नेहमीच दिवसाची रात आणि रातीचा दिवस करून घाम गाळून एका कथानकाचे जिवंत रूपांतर प्रेक्षकांसमोर सादर करतात. यातील काही कथा प्रेक्षक समोर जगतात. कधी रडतात, कधी खळखळून हसतात तर कधी कडाडून टाळ्यांचा गडगडाट करतात. या भावनाच खऱ्या कलावंतासाठी पोचपावती. यात एकांकिका क्षेत्राचा स्वतःचा असा एक दर्जा आहे. हा दर्जा कायम राहावा म्हणून कित्येक एकांकिका स्पर्धा होत असतात. एकांकिका क्षेत्रात चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका स्पर्धा’ आठवण गणेश सोळंकींची.. ‘ही यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. यावर्षीही सवाई होणार मात्र सवाईंमध्ये चुरशीची लढत होणार.
दरवर्षी जानेवारी ते डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांतून केवळ प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांमध्ये सवाई एकांकिका स्पर्धा पार पडत असते. हि स्पर्धा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रभर जल्लोषात पार पडते. कोरोनामुळे या वर्षभरात राज्यात कुठेच एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत, परंतु तमाम रंगकर्मींच्या मनातील स्पर्धे विषयीच्या भावना मात्र कायम आहेत. म्हणूनच चतुरंग प्रतिष्ठान यंदा वेगळ्या पद्धतीने स्पर्धा आखतेय. साल १९८७ ते २०२० पर्यंत या स्पर्धेचे आयोजन अव्याहतपणे होत राहिले आहे. यानंतर या वर्षी गेल्या ३४ वर्षांतील सवाई एकांकिका स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सर्व संस्थां आणि एकांकिकांचीच ‘सवाई स्पर्धा’ होणार असून यातून निवडली जाणारी सर्वोत्कृष्ट एकांकिका ही यंदा ‘सवाई’तील ‘सवाई एकांकिका’ ठरणार आहे.
‘सवाई एकांकिका’ स्पर्धेविषयी काही महत्वाच्या बाबी:-
० ‘सवाई प्रथम’चा सन्मान मिळविलेल्या सर्व संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चतुरंग प्रतिष्ठान करीत असून त्या त्या स्पर्धक संस्थांनी ‘सवाईपद प्राप्त केलेली एकांकिकाच’ यंदाच्या स्पर्धेत सादर करणे अपेक्षित आहे.
० अर्थात १९८७ सालापासूनचा आजवरचा लोटलेला दीर्घ कालावधी लक्षात घेता त्याच कलाकार संचात एकांकिका सादर करणे काही संस्थांना अशक्य ठरू शकते. त्यामुळे त्याच विजेत्या एकांकिकेचे सादरीकरण अन्य कोणत्याही सोयीच्या कलाकारांना घेऊन करणे या वर्षीच्या स्पर्धेपुरते चतुरंग प्रतिष्ठानला मान्य असणार आहे.
० हीच बाब तांत्रिक गोष्टींसाठी सहभागी असणाऱ्यांनाही लागू केली जाईल. एकांकिकेबाबत मात्र सवाई प्रथम ठरलेली एकांकिकाच सादर करावी लागेल हा ठळक नियम राहील.
० स्पर्धक संस्थांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या स्पर्धा आयोजनाचे नव्याने निश्चित केलेले नियम-निकष व अन्य सर्व तपशील उत्सुक स्पर्धकांना फोन संपर्काद्वारे किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येतील.
० अंतिम फेरीचे आयोजन तत्कालीन बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने करण्याचा मुद्दादेखील विचाराधीन राहील.
० सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांची या दोन्ही पद्धतीने सादरीकरणाची तयारी असावी, असेही आयोजकांनी नमूद करीत माध्यमांना कळविले आहे.