‘तू तेव्हा तशी’ मालिकेचे मोहक शीर्षक गीत चर्चेत; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली मालिका ‘तू तेव्हा तशी’ हळूहळू लोकांच्या पसंतीस उतरते आहे. मालिकेतील सौरभ आणि अनामिका दोघेही प्रेक्षकांचे लाडके होऊ लागले आहेत. हि गोष्ट आहे त्यांच्या अव्यक्त प्रेमाची. एकीकडे मालिकेच्या कथानकाची सर्वत्र चर्चा आहे. तर दुसरीकडे मालिकेच्या शीर्षकगीताची देखील चर्चा रंगली आहे. हे शीर्षक गीत इतके मोहक आहे कि रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर अगदी सहज याचे बोल येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर शीर्षक गीत कसे असावे तर असे असावे ट्रेंडिंग मध्ये आहे.
तू तेव्हा तशी या मालिकेचे हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर या गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षक गीत यशस्वी होण्यामागे पडद्यामागील सर्व तंत्रज्ञांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे समीर सप्तीसकर यांनी सांगितले आहे. तसेच या शीर्षकगीताबद्दल बोलताना समीर म्हणाले कि, “एखादी धून रचण्यासाठी पुरेसा वेळ लागतो.
तसंच या शीर्षकगीताची संकल्पना जवळपास ४ महिन्यांपूर्वी ठरली होती आणि पहिल्यांदाच एखाद्या गीताच्या चालीवर मी ४ महिने काम केलं. मी अभिषेकला शीर्षक गीताची धून पाठवायचो आणि त्यावरून तो ते शब्दबद्ध करायचा, अशा पद्धतीने फक्त फोनवरून संवाद साधून हे शीर्षकगीत तयार केलं.
पुढे म्हणाले कि, अवघ्या काही दिवसांतच या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. मुख्य म्हणजे ज्यांच्यावर चित्रित करायचं होत त्यांना म्हणजेच स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांना हे शीर्षकगीत प्रचंड आवडलं आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतंय याचा खूपच आनंद आहे.” तू तेव्हा तशी हि मालिका २० मार्च २०२२ पासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. यामध्ये स्वप्नील जोशी सौरभची तर शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे.