कोण आहे एलिझाबेथ? कुणाचा घेणार ‘बळी’; स्वप्नील जोशीच्या हॉरर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच एका चित्त थरारक आणि भयावह कथानकाचे सादरीकरण घेऊन येतोय. एक नवी भूमिका आणि एक नवी कथा पण अंगावर शहारे आणणारी. ‘बळी’ या चित्रपटातून एक नवीन हॉरर आणि सस्पेंस थ्रिलर कथानक आपल्यासाठी ९ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येईल. या चित्रपटात स्वप्नील जोशी, पूजा सावंत आणि समर्थ जाधव या कलाकारांच्या मुख्य आणि लक्षवेधक भूमिका असतील. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाले आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर कुणालाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही कि, कोण आहे एलिझाबेथ? आणि ती कुणाचा घेणार ‘बळी’?
निर्माता विशाल फ्यूरिया यांनी बळी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्या ग्लोबल स्पोर्टस् एंटरटेन्मेंट अॅण्ड मीडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘बळी’ हा चित्रपट ९ डिसेंबर २०२१ रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या कथानकाचे श्रेय विशाल फ्यूरिया आणि स्वप्नील गुप्ता यांना जाते. तसेच चित्रपटातील थरार कायम ठेवणारे संगीत रंजन पटनाईक, ब्रिन्स बोरा यांनी तयार केलेले आहे. एकंदरच हा चित्रपट मराठीतील दर्जात्मक हॉरर चित्रपटांपैकी एक असा संयोजित केला असल्यामुळे प्रेक्षकांनाही पाहताना मजा येईल असे दिग्दर्शकांनी स्पष्ट केले आहे.
‘बळी’ हा चित्रपट एकंदरच अश्या कथानकावर आधारित आहे जे काल्पनिक आहे. तसेच चित्त थरारक आणि अंगावर शहारे आणणारे आहे. या चित्रपटात विधुर, मध्यमवर्गीय वडिल श्रीकांत या भूमिकेत अभिनेता स्वप्नील जोशी दिसणार असून तो एका नव्या जीवनप्रवासाची सुरुवात दर्शवितो. श्रीकांतला ७ वर्षाचा मुलगा असतो. ज्याचे नाव मंदार असते. मंदार या भूमिकेत बाल अभिनेता समर्थ जाधव दिसेल. कथानकानुसार, मंदार चक्कर येऊन पडतो आणि सविस्तर निदानासाठी त्याला जनसंजीवन या रुग्णालयात उपचारासाठी श्रीकांत नेतो आणि कथानकाचे रंजक वळण इथूनच येते.
कारण उपचारासाठी दाखल झालेला मंदार एका गूढमय परिचारिकेसोबत बोलू लागतो. हि परिचारिका रुग्णालयाच्या पडक्या भागात राहत असल्याचे मंदार वारंवार सांगतो. या दरम्यान एलिझाबेथ या केवळ नावाचा उल्लेख आणि ये बाळा या हाकेच्या उल्लेख दिसून येतो. मात्र गूढ कायम राहते. त्यामुळे आता हि एलिझाबेथ कोण आणि हि कुणाचा बळी घेणार का? असा एक प्रश्न उपस्थित राहतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला ९ डिसेंबर रोजी ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर थरारक ‘बळी’ पाहावा लागेल.