Take a fresh look at your lifestyle.

अपूर्ण कुटुंब होईल का भोंव भोंव आणि म्याव म्याव’ने पूर्ण..?; पहा ललित- सईचं ‘पेट पुराण’

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लग्न झालं म्हणजे किमान वर्षभरात एक मुलं व्हायलाच पाहिजे अशा विचारसारणीला भेद देणारी एक कमाल वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीला येतेय. या वेब सीरिजचे नाव ‘पेट पुराण’ असे आहे. पालक होण्यासाठी मुलाला जन्म देणं गरजेचं नाही अशी वेगळी संकल्पना या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसाठी सादर केली जात आहे. या वेबसिरीजमध्ये मराठी अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांची भन्नाट केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. अनुक्रमे अतुल आणि अदिती अशी यांच्या पात्रांची नावे आहेत. हि वेब सिरीज ६ मे २०२२ पासून सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

सध्याच्या आधुनिक काळातील अतुल आणि अदिती या जोडप्याला मुले आणि मोठे कुटुंब नको आहे. पण समाज सांगतो कि पालकत्व हवंच. पण मुलं नसतानाही पालक होता येत यावर ठाम विश्वास असणारे हे दांपत्य शेवटी पाळीव प्राण्यांना दत्तक घेतात. यातही त्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची आवड असल्यामुळे अतुल व्यंकूचे आणि अदिती बकूचे संगोपन करू लागते. आता पालक होणं काही सोप्प नाही.

त्यामुळे व्यंकू आणि बकूसोबत हे कुटुंब पूर्ण करताना अतुल आणि अदितीची होणारी कसरत यामध्ये पहायला मिळणार आहे. ‘पेट पुराण’ची निर्मिती आणि लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे. तर ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. ‘पेट पुराण’ हा वेब शो मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या ७ भाषांमध्ये पाहता येईल.

P

सध्या ‘पेट पुराण’चा ट्रेलर सोशल मीडियावर भारी चर्चेत आहे. शिवाय ललित आणि सईपेक्षा व्यंकू आणि बकुची सोशल मीडियावर जोरदार बॅटिंग सुरु आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच सईचा ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मराठीतील पहिला आयफोन चित्रित चित्रपट आहे. यामध्ये सई, वैभव आणि अमृता मुख्य भूमिकेत आहेत. तर ललित प्रभाकरची ‘शांतीत क्रांती’ ही पहिली वेब सिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही वेब सिरीज तीन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीच्या प्रवासाची गोष्ट आहे.