Take a fresh look at your lifestyle.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांना पाकिस्तानकडून श्रद्धांजली; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील दिग्गज अभिनेते मोहम्मद यूसुफ खान उर्फ ​​दिलीप कुमार यांनी बुधवारी ७ जुलै २०२१ रोजी पहाटे अखेरचा श्वास घेतला. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. बर्‍याच काळापासून ते प्रकृतीच्या तक्रारींनी ग्रस्त होते. शिवाय त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरु होते. मात्र अखेर… अखेर त्यांचा प्रवास थांबला आणि बॉलिवूडमधले एक पर्व कायमस्वरूपी संपले. दिलीप कुमार यांचे निधन बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी अत्यंत नुकसानदायक आणि हादरा देणारी बाब ठरली. दरम्यान चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी दिलीप साहब यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इतकेच नव्हे तर, राजकीय मंडळींसह पंतप्रधानांनीही दुःख व्यक्त केले आहे. यानंतर आता भारतासह पाकिस्तानने सुद्धा दिलीप कुमार अर्थात युसूफ खान यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या वडिलोपार्जित घराबाहेर नमाजदेखील पढण्यात आला आणि हे घर पाकिस्तानच्या पेशावर येथे आहे. अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी याच घरात झाला होता. इतकेच काय तर त्यांचे बालपणदेखील त्यांनी याच घरात आणि याच ठिकाणी घालवले होते.

यामुळे पेशावरमध्ये त्यांच्या चाहत्यांनी आणि नातेवाईकांनी दिलीप सहाब यांच्यासाठी गायबाना नमाज-ए-जानझा (अंत्यसंस्कारासाठी वाचली जाणारी नमाज) वाचली. तसेच मेणबत्त्या लावून त्यांना अखेरचा निरोप दिला. याशिवाय त्यांच्या चाहत्यांनी दिलीप साहब यांचे जीवन फतेह (प्रार्थना)देखील केले.

याशिवाय भारतासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट करून लिहिले की, “दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले. मी त्यांचे औदार्य विसरू शकत नाही. ते माझ्या पिढीतील सर्वात महान आणि सर्वात अष्टपैलू असे अभिनेते होते.”

तसेच १९९८ सालामध्ये पाकिस्तान सरकारने दिलीप कुमार यांना निशान- ए- इम्तियाज पुरस्काराने गौरविले होते. हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. याशिवाय पाकिस्तानमधील दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराला राष्ट्रीय वारसाचा दर्जा देण्यात आला आहे. सरकार या घराचे संग्रहालयात रूपांतर करीत असल्याची माहिती मिळत आहे.