Take a fresh look at your lifestyle.

कोण काय म्हणत यापेक्षा सत्य महत्वाचं; बॉलिवूडकरांच्या आरोपावर समीर वानखेडे कडाडले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या झगमगाटी दुनियेचे सत्य फार वेगळे आहे. यावर आता अनेकांचा विश्वास बसू लागला आहे. कारण बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण सतत वेगवेगळ्या उघडकिस येणाऱ्या सत्यांमुळे चर्चेत आहे. खोलपर्यंत रुजलेली ड्रग्जची पाळंमुळं सध्या NCB खोदून काढण्याचं काम करताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर खरंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यांनतर या इंडस्ट्रीमधून कित्येक मोठमोठ्या नावांचा खुलासा झाला. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानदेखील यात आढळला असल्यामुळॆ NCB ने कडक कारवाई केली आहे. परंतु यावेळी बॉलिवूडकरांनी आम्हालाच लक्ष्य केले जाते असा आरोप NCB वर केला आणि म्हणून NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगल्या कडक शब्दात उत्तर दिले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे म्हणाले कि, आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करत आहोत, असा आरोप आमच्यावर अनेकदा लागला आहे. पण याला अर्थ नाही. कोण काय म्हणतं यापेक्षा सत्य काय आहे आणि आकडे काय सांगतात, ते महत्त्वाचं आहे. गेल्यावर्षी १० महिन्यांत आम्ही एकूण १०५ लोकांवर गुन्हे दाखल केले. यापैकी किती सेलिब्रिटी होते, ते सांगा. फक्त मोजके काही जण. यावर्षीही आम्ही ३१० जणांना अटक केली, त्यापैकी किती सेलिब्रिटी आहेत? एनसीबीने १५० कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले, पण याची जराही चर्चा झाली नाही. सध्या मीडिया आर्यन खानची स्टोरी चालवत आहे. पण त्याच्या २ दिवसाआधी आम्ही ५ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. पण मीडियाने त्या स्टोरीत इंटरेस्ट दाखवला नाही.

पुढे, गेल्या आठवड्यात आम्ही ६ कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. त्याचा संबंध अंडरवर्ल्डशी होता. पण एकाही चॅनलने ही न्यूज दाखवली नाही. आमचा एक सहकारी नायझेरियन ड्रग्ज डिलरला पकडताना जखमी झाला, पण कोणीच ही बातमी उचलून धरली नाही. आम्ही एखाद्या लोकप्रिय वा सेलिब्रिटी व्यक्तिला पकडल्यावर मीडिया त्यावर तुटून पडते. त्यामुळे आम्ही फक्त बॉलिवूडला लक्ष्य करतो हा आरोप आमच्यावर लावू नका. आमची टीम फक्त आपलं काम करते. यात काही सेलिब्रिटी पकडले जात असतील तर त्यांना का सोडायचं? सर्वांसाठी नियम सारखे आहेत आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाहीच. केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना नियम तोडण्याचा अधिकार मिळत नाही. आम्ही केवळ ड्रग्ज पेडलर्सला पकडावं, केवळ झोपडपट्टीत छापे मारावे, असं होणार नाही, असे म्हणत वानखेडेंनी आरोप कर्त्यांना चांगलेच सुनावले आहे.