Take a fresh look at your lifestyle.

दादरच्या तुलसी पाईप रोडचं रुपडं पालटलं; भिंतीचित्रातून अवतरले मराठी कलाकार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मराठी सिनेसृष्टीचा दर्जा फार मोठा आहे आणि तो टिकवण्यासाठी प्रत्येक कलाकार कितीतरी धडपडत असतो. आज मराठी सिनेसृष्टी ज्या स्तरावर आहे तिथंपर्यंत ती असण्यात अनेक दिग्गज कलाकार आणि कलाकृतींचा समावेश आहे. याच दर्जेदार मराठी चित्रपट कलाकृतींचा नजराणा घेऊन ‘प्रवाह पिक्चर’ हि नवीकोरी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यांनी नुकताच एक विशेष लक्षवेधी उपक्रम राबवला आहे. यामूळे मुंबईतील दादर परिसरातील तुलसी पाईप रोडच्या भिंतींचे रूप बदलून गेले आहे. या भिंतीवर भिंतीचित्र साकारण्यात आलं आहे आणि ते हि मराठी कलाकारांचं.

गेल्या महिनाभरापासून अनेक चित्रकार या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतत होते आणि अखेर आज मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. मराठी अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या उपस्थितीत या भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं. यावेळी हि भिंतीचित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचा सन्मानदेखील करण्यात आला. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना केदार शिंदे म्हणाले कि, प्रवाह पिक्चर वाहिनीच्या अगदी लॉन्च सोहळ्यापासून ते आता या भव्यदिव्य अश्या भिंतीचित्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा दिसत आहे.

पुढे म्हणाले कि, आम्ही जेव्हा चित्रपट करायला लागलो तेव्हा फ्लेक्सचा जमाना होता. पण आम्ही जेव्हा चित्रपट पहायचो तेव्हा आपल्या सिनेमाची अशी चित्रकारांच्या कुंचल्यातून रंगलेली भिंतीचित्र सर्वत्र लागावीत अशी इच्छा होती. आज प्रवाह पिक्चरमुळे ही इच्छा पूर्ण झाली आहे. तुलसी पाईप मार्ग हा बऱ्याच आठवणींचा साक्षीदार आहे. या मार्गाने अनेक एकांकिका जिंकल्याचा आनंदही पाहिलाय आणि बक्षिस मिळालं नाही की दु:खही वाटून घेतलं आहे. आज याच मार्गावर आपल्या सिनेमांची चित्र साकारली जात आहेत याचा अभिमान आणि आनंद आहे. चला पिक्चरला जाऊया हे प्रवाह पिक्चर या वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे भिंतीचित्रांच्या माध्यमातून रेखाटलेले असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील जे त्यांच्या आयुष्याशी आणि आठवणींशी निगडीत असतील.

अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला कि, सध्या डिजिटलचा जमाना असला तरी हाताने रंगवलेल्या या भिंतीचित्रांची मजा न्यारीच आहे. यानिमित्ताने अनेक चित्रकारांना पुन्हा एकदा रोजगाराची संधी मिळाली आहे. प्रवाह पिक्चर वाहिनीचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपली संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी या मार्गावर दिमाखात साकारण्यात आली आहे हे सुखावणारं आहे.

तसेच अभिनेता भरत जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले कि, ही कल्पना खूप भन्नाट आहे. प्रवाह पिक्चर वाहिनीच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करावसं वाटतं. आज आमच्या सिनेमांची चित्र रेखाटण्यात आली आहेत आणि त्याच्या अनावरणासाठी आम्ही तिघं एकत्र आलो याचा आनंद आहे. ही भिंतीचित्र पाहून आज निर्जीव भिंतींमध्येही नवं चैतन्य आलं आहे. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कलाकार म्हणून मला अतिशय अभिमान वाटतोय. इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही चित्र आनंद देत रहातील.