Take a fresh look at your lifestyle.

‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; कंगनाला भित्रट म्हणत तुषार गांधींनी केला पलटवार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने एका पाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र लावलेले आहे. अलीकडेच तिला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एका मुलाखतीत १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळाले असे म्हणत मोठा वाद ओढवून घेतला होता. यानंतर देशभरातून टीकांचा मारा झाल्यानंतर ती शांत बसली नाही तर यावेळी तिने थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींवर निशाणा साधला. कंगनाने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात केलेल्या विधानांवरून आणखी एक वाद उफाळला. परिणामी देशभरातील कंगनाविरोधात संताप तीव्र होत चालला आहे. दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता बोस यांनी कंगनाला चांगलेच फटकारले आहे. यानंतर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीदेखील कंगनाचा समाचार घेतला आहे.

कंगना म्हणते की, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना सत्तेच्या भुकेल्या आणि धूर्त लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले होते. हे ते लोक होते ज्यांनी त्यांचे शोषण केले. यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती किंवा त्यांचे रक्तही उसळले नाही. हेच लोक आम्हाला शिकवतात, जर तुम्हाला कोणी थप्पड मारली तर दुसर्‍या गालावर दुसरी थप्पड खा आणि अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. पण कोणालाही असे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा प्रकारे फक्त भीक मिळते. म्हणून आपले आदर्श हुशारीने निवडा, असे कंगनाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत म्हटले होते. यानंतर आता तुषार गांधी यांनी एक लेख लिहून कंगनाच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मंत्रावरून टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उत्तर देताना गांधींचा तिरस्कार करणाऱ्यांपेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडस लागतं असं शिर्षक देत त्यांनी एक लेख लिहिला आहे. जे लोक आरोप करतात की गांधीवादी फक्त दुसरा गाल पुढे करतात कारण ते घाबरतात. खरंतर हे धाडस करण्यासाठी आवश्यक असलेल्या हिंमतीला ते समजू शकत नाहीत. ते अशा प्रकारचे शौर्य समजून घेण्यास समर्थ नाहीत. दुसरा गाल पुढे करणं हे घाबरण्याचं लक्षण नाही. यासाठी खूप धाडस लागत. त्यावेळी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ते दाखवलं होतं ते सर्वजण हिरो होते, तर भित्रट लोक आपल्या डोळ्यांची पापणीही न हालवता वैयक्तिक फायद्यासाठी दयेसाठी याचना करत होते. घाबरट ते होते ज्यांनी स्वार्थासाठी दया आणि क्षमा याचना करताना एकदाही मागेपुढे पाहिलं नाही.

पुढे, तुम्ही खोटे कितीही जोरात ओरडून सांगितले आणि सत्याचा आवाज कितीही छोटा वाटत असला तरी तेच टिकते. खोटे जिवंत ठेवण्यासाठी एकामागोमाग अनेक खोटे सांगावे लागते. सध्याच्या घडीला काही खोट्या गोष्टी ओरडून सांगितल्या जात आहेत, ज्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचे स्वागत करतील. आपल्या देशासाठी, लोकांसाठी त्यांची भीक मागायला हरकत नव्हती. ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचेही त्यांनी कौतुक केले होते. पण शेवटी याच फकिरासमोर ब्रिटीश राजवट अखेर शरण आली, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे. १९४७ ला भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती या कंगनाच्या वक्तव्यावर लिहिताना तुषार गांधी यांनी लिहिलं की, हा हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अपमान आहे.