Take a fresh look at your lifestyle.

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि पत्नी उमा यांना कोरोनाची लागण; लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा नवा व्हेरियंट चांगलाच कहर करताना दिसतोय. सर्वसामान्य, नेते मंडळी आणि आता बॉलिवूडकरांनाही कोरोना काही जगून देत नाही हे दिसून येतेय. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा बॉलिवूडकरांना सगळ्यांना सळो कि पळो करून सोडले आहे. अलीकडेच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता सेलिब्रेटींसोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब धोक्यात आले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी ते लीलावती रुग्णालयात भरती झाल्याचीही माहिती मिळत आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांवरही डॉ.जलील पारकर यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, प्रेम चोप्रा आणि त्यांच्या पत्नीने मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल घेतले आहे आणि आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसतेय. शिवाय प्रेम चोप्रा यांचे शरीर उपचारांना खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल असे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यास त्यांना त्वरित २ दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या आधी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांचाही कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. याबाबत जॉनने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली होती. तर नुकतेच अभिनेता अर्जुन कपूरसह त्याच्या कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले होते.

याशिवाय नुकतीच निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूरलाही कोरोनाची लागण झाली असून तिनेही माहिती दिली आहे. तर अभिनेता नकुल मेहता, त्याची पत्नी आणि ११ महिन्याचं बाळदेखील कोरोनाला तोंड देत असून ICU मध्ये उपचार घेत आहे.