Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटसृष्टीतील ‘देव’ अनंतात विलीन; 60 वर्षाहून अधिक काळ गाजवली कारकीर्द

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव यांचे २ फेब्रुवारी २०२२ रोजी बुधवारी निधन झाले. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाले. दरम्यान ते ९३ वर्षाचे होते. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टी शोकग्रस्त झाली आहे.

गुरुवारी ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार क्रिया झाल्या आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक उमदा तारा निखळला. रमेश देव यांच्या पश्चात पत्नी,अभिनेत्री सीमा देव, पुत्र आणि अभिनेता अजिंक्य देव, पुत्र आणि दिग्दर्शक अभिनव देव तसेच नातवंडे आर्य देव, तान्या देव असा परिवार आहे.

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ साली अमरावती येथे झाला. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. कारण रमेश देव यांचे वडील ठाकूरदेव हे ब्लॅक नाद व्हाईट काळातील प्रसिद्ध फौजदारी वकील होते. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचे आडनाव देव असे झाले. कोल्हापूरात वाढलेले रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि राजबिंडा देह असणारे रमेश देव यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी नाटक, चित्रपट करण्याचे आधीच ठरवले होते. यानंतर तरुणपणी १९५१ मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मारतो एक डोळा’ या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे रमेश देव यांची अनोखी ओळख तयार झाली. पुढे राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरला.

यानंतर ‘आलिया भोगासी’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची नलिनी सराफ यांच्याशी भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी १ जुलै १९५३ साली त्यांचा विवाह झाला आणि नलिनी सराफ सीमा रमेश देव झाल्या. रमेश देव हे नाटक, चित्रपट आणि टीव्ही अभिनेता होते. त्यांनी ६० वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवली आहे.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत २८५हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. याशिवाय टीव्ही मालिका आणि २५०हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. पुढे राजेश खन्ना यांच्या ‘आनंद ‘ चित्रपटात रमेश व सीमा देव एकत्र झळकले होते.

रमेश देव यांचे ‘या सुखा़ंनो या’ या नावाने आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट ते बॉलीवूडपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल असा प्रवास केला आहे. सोने पर सुहागा, आजाद देश के गुलाम, कुदरत का कानून, इलजाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, मैं आवारा हूं, आखिरी दांव, प्रेम नगर, कोरा कागज, आनंद, आरती, मेरे अपने, आपकी कसम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले.

तर बाप माझा ब्रम्हचारी, एक धागा सुखाचा, प्रेम आंधळ असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, येरे माझ्या मागल्या, आई मला क्षमा कर, राम राम पाव्हणं, अवघाची संसार, पसंत आहे मुलगी, यंदा कर्तव्य आहे, दोस्त असावा असा हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील गाजलेले चित्रपट आहेत.