Take a fresh look at your lifestyle.

गायकीतला सूर हरपला; गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या 92’व्या वर्षी निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील अनेक सदाबहार गीतांना आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. दरम्यान त्या ९२ वर्षाच्या होत्या. त्यांचे निधन हि संपूर्ण जगभरात शोककळा निर्माण करणारी बातमी आहे. रविवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास लता दीदींनी प्राणज्योत मालवली. साधारण २७ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे लता दीदींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यांनतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. प्रकृतीच्या दृष्टिकोनातून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर व्हेंटिलेटर काढण्यातही आला होता. मात्र अगदी काहीच तासांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु झुंज संपली आणि अखेर लता दीदींनी जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे संपूर्ण जगभरात त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

 

 

लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये डॉ.प्रतीत समदानी यांच्या निदर्शनाखाली उपचार सुरु होते. लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा यावी यासाठी एक विशेष डॉक्टरांची टीम नेमण्यात आली होती. प्रत्येक डॉक्टर दीदींच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रयत्न करीत होता. काही अंशी दीदींची प्रकृती सुधारली देखील होती. मात्र अखेर या उपचारांचा काहीच फायदा झाला नाही आणि सुरातला स हरपला. लता दीदींची झुंज थांबली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. लता दीदींच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली असून या वृत्तामुळे सिनेसृष्टीत शोककळा निर्माण झाली आहे. तर दीदींच्या चाहत्यांकडून टाहो फोडण्यात येत आहे.

 

लता मंगेशकर एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका म्हणून त्यांचा उल्लेख आहे. आजतागायत त्यांना हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे.