Take a fresh look at your lifestyle.

विद्या बालनच्या शिरपेचात मानाचा तुरा; भारतीय सैन्याच्या फायरिंग रेंजला दिले अभिनेत्रीचे नाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक अभिनेत्री म्हणजे उलाला गर्ल अर्थात अभिनेत्री विद्या बालन. विद्याने नेहमीच आपल्या सुंदर आणि वास्तवदर्शी अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे अनोखे स्थान निर्माण केले आहे. शिवाय विद्या तिला मिळालेल्या विविध भूमिका नेहमीच जीव ओतून साकारते. यामुळे चाहत्यांचीही ती लाडकी अभिनेत्री आहे. तिने आजपर्यंतच्या कारकिर्दीत कधीच साचेबद्ध काम केले नाही. नेहमीच विविध आव्हानात्मक भूमिका साकारणे हि तिची खासियत आहे. विद्या नुकतीच ऑस्कर समितीची सदस्य झाली आहे आणि आता यानंतर आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्या बालनचे नाव गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला देण्यात आले आहे.

भारतीय सैन्याने काश्मीरमधील गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचे नाव दिले आहे. हि बाब खरोखरच अभिमानाची आहे. कारण आता ही फायरिंग रेंज ‘विद्या बालन फायरिंग रेंज’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखली जाणार आहे. यापूर्वी या रेंजला कोणतेही नाव दिलेले नव्हते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विद्या बालनने काश्मीरमधील ‘गुलमर्ग विंटर फेस्टिव्हल’मध्ये तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर याच्यासोबत हजेरी लावली होती. अत्यंत धाडसी, सामाजिक मुद्द्यांबाबत सकारात्मक विचारसरणी असणारी, स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्रियांच्या प्रतिमा पडद्यावर दर्शवित आपली अनोखी छाप उमटवणार्‍या अभिनेत्रीच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याने विद्या बालनचे नाव फायरिंग रेंजला देण्याचे ठरवले.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर नुकताच तिचा शेरनी हा एक अत्यंत आगळ्या वेगळ्या कथानकावर आधारलेला चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला. मुख्य म्हणजे या चित्रपटात विद्या बालनने पहिल्यांदाच एका महिला वन अधिकारी हि आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला आणि चित्रपटातील तिच्या लुकला, त्याचसोबत चित्रपटाच्या अनोख्या कथानकाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता विद्याचे नाव भारतीय सैन्याच्या फायरिंग रेंजला दिल्यानंतर तिच्यासह बॉलिवूड इंडस्ट्रीची देखील मान उंचावली आहे.