Take a fresh look at your lifestyle.

‘.. हंबीरराव’ हा मराठीतला मैलाचा दगड; विजू मानेंकडून ऐतिहासिक कलाकृतीचे विशेष कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी सिनेसृष्टीत अत्यंत आघाडीवर कार्यरत असणारे लेखक, अभिनेता दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण विठ्ठल तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. तळबीड गावचे सुपुत्र व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा २७ मे २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटातला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज चित्रपट पाहिल्यानंतर कलाकार आणि कलाकृतीचे कौतुक करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा चित्रपट पहायला विजू मानेंसह कुशल बद्रिके आणि सिद्धार्थ जाधव देखील गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर स्टँडी पोस्टरसोबत त्यांनी एक फोटो काढला आहे. तोच फोटो शेअर करत विजू माने यांनी हि पोस्ट लिहिली आहे.

‘वारंवार थिएटरमध्ये जाऊनच पाहावा’ असा मराठी चित्रपट आला सरसेनापती हंबीरराव… काही सिनेमे आपण चित्रपटसृष्टीत काम करत असल्याचा अभिमान जागवत असतात. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यातीलच एक. खरंतर कुठलाही ऐतिहासिक चित्रपट हे कुठल्याही दिग्दर्शकासाठी आव्हान असतं. केवळ ‘बजेट नव्हतं’ हे कारण पुढे करता येत नाही. कारण सामान्य रसिक प्रेक्षक ‘मग बनवू नका’ अशा उत्तराला तयार असतो. माझा मित्र प्रवीण तरडे यांन संपूर्ण तन-मन आणि धन लावून हा नितांत सुंदर, अभिमानास्पद, प्रेरणादायी चित्रपट बनवला आहे. या चित्रपटातील सगळ्यांचं कौतुक आहे. पण दिग्दर्शकाच्या डोळ्याचे काम करणारा महेश लिमये यांचे विशेष कौतुक. प्रत्येक फ्रेम डोळे दिपवणारी आणि त्या त्या प्रसंगाला समर्पक अशा प्रकाशचित्रणाची. हंबीरराव हा सिनेमा मराठीतला मैलाचा दगड आहे हे मात्र निश्चित.

सर्वच कलाकारांनी जीवनातून चित्रपटासाठी काम केल्याचं जाणवतं. प्रमुख भूमिकेतील प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी श्रुती मराठे, आणि बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये सगळ्यांनीच पडदा व्यापून टाकणारी काम केलीत. (फक्त एवढ्याचजणांची नावं घेतली आहेत कारण बाकीच्या सगळ्यांची नाव घ्यायला गेलो तर अख्खा पात्रपरिचय मला इथे टाकावा लागेल.) चित्रपट पाहताना आपलं रक्त सउळसळतं, हात सतत टाळ्या वाजवण्यासाठी शिवशिवतात, आणि पिक्चरभर पन्नास वेळा तरी अंगावर काटा येतो. सगळ्यात महत्त्वाचं माझ्याबाबतीत घडलं, ते म्हणजे चित्रपट पाहिल्यावर कधी एकदा रायगडावर जाऊन महाराजांच्या दरबारात कुर्निसात घालतो. असं वाटणं हे या चित्रपटाचं यश आहे असं मला वाटतं. Bravo team.