Take a fresh look at your lifestyle.

हेमा मालिनीनंतर आता कंगनाच्या गालासारखे रस्ते?; आणखी एका आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी अलीकडेच नगर पंचायत निवडणुकीदरम्यान नेत्यांनी आपली सीमा सोडत अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालाची रस्त्यांशी तुलना करणारे वक्तव्य केले होते. यानंतर अशा पद्धतीने अभिनेत्रीच्या नावाचा वा विशेषांगचा उल्लेख त्यांच्या अंगलट आला होता. अभिनेत्रीने संताप व्यक्त केल्यानंतर नेत्याने माफीदेखील मागितली होती आणि मग हे प्रकरण संपले असे म्हणण्यात आले. यानंतर आता आणखी एका आमदाराने अभिनेत्री कंगना रनौतच्या गालांवर वक्तव्य केलं आहे. त्यामुळे लवकरच आणखी एक वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झारखंडमधील काँग्रेसचे जामतारा विधानसभेचे आमदार डॉ.इरफान अन्सारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जामतारा परिसरात बांधलेले रस्ते चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करण्याचा दावा त्यांनी केला आहे. जामताऱ्यात असे रस्ते बांधले जातील, ज्यामध्ये लोकांना ना धूळ फेकावी लागणार आहे, ना खड्ड्यांचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, हे सर्व रस्ते लवकरच तयार करण्याचा दावा आमदारांनी केला आहे. तसेच त्यांनी जामतारा रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारदेखील मानले आहेत. अद्याप कुणी यावर आक्षेप घेतला नसला तरीही याआधी हेमा मालिनीविषयीचे वक्तव्य भोवल्याचा नेत्यांचा अनुभव दांडगा आहे.

त्यावेळी नगर पंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे नेते पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री पद भूषविणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना डिवचण्यासाठी, माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा भाजपाकडून तीव्र निषेध करण्यात आला होता. यानंतर अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनीदेखील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत संताप व्यक्त केला होता. आधीच कंगना वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यात तिच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर ती बोलणार नाही असे होईल अशी फारच कमी अपेक्षा आहे.