Take a fresh look at your lifestyle.

माझ्या वजनाबद्दल इतके प्रश्न का..? अन्विता फलटणकरने व्यक्त केली खंत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील स्वीटू म्हणजे अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने तिच्या अभिनयामुळे अगदी थोड्या वेळात अधिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अन्विता एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचसोबत ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे. हि मालिका ज्या कथानकाशी संबंध ठेवते ते कथानक पूर्णतः स्वीटू या व्यक्तिरेखेचे वर्णन करणारी आहे. खरतर ही भूमिका बऱ्याच मुलींसाठी खूप रिलेटेबल आहे. वजनदार असणे हा काही गुन्हा असू शकत नाही. मात्र समाजाचा जाड मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा असाच असतो. याचबाबत बोलताना अभिनेत्री अन्विता फलटणकरने तिच्या वजनावर उचलल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत खंत व्यक्त केली आहे.

वजनदारपणा बद्दल मत व्यक्त करताना अभिनेत्री अन्विता फलटणकर म्हणाली, ”मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे आणि विचारणारे खूप आहेत. कधीकधी खूपच उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी थोडा का होईना फरक पडतोच.

पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे ‘मी सुंदर आहे का?’ हा प्रश्न मला पडला होता. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं हे जास्त महत्त्वाचं आहे.” अन्विता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसह तिचे धम्माल व्हिडीओ आणि फोटो शेअर करते.

या मालिकेमुळे स्वीटू अर्थात अन्विता फलटणकरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या वजनापेक्षा तिच्या अभिनयाकडे पाहून बोलणाऱ्यांची संख्या तिच्या वजनावर बोलणाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे. तिचा चाहता वर्ग दररोज थोडा थोडा वाढताना दिसतोय. तिच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड रस आहे.

रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या चित्रपटात अन्विताने प्रथमेश परब, केतकी माटेगावकर, भाऊ कदम आणि वैभव मांगले यांच्या मुख्य भूमिकांसह सहाय्यक भूमिका साकारली होती. या चित्रपटातील मुख्य पात्र प्राजक्ता अर्थात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीच्या भूमिकेत अन्विता झळकली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तसेच तिने गर्ल्स या चित्रपटात देखील आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे.