Take a fresh look at your lifestyle.

देशाच्या स्वातंत्र्याविषयी केलेले वक्तव्य कंगनाला भोवणार?; राजकीय मंडळींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी जोरावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि वादविवाद यांचे नाते फार जुने आहे हे आपण सारेच जाणतो. कंगना नेहमीच आपले मत स्पष्ट आणि परखड मांडते. यानंतर तिची वक्तव्य वादास कारणीभूत ठरतात. नेहमीप्रमाणे याहीवेळी कंगनाने अशी काही मुक्ताफळे उधळली आहेत कि यामुळे काही थोडेथोडके नव्हे तर सारे भारतीय खवळले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते वरुण गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्याकडून कंगनावर सडकून टीका करण्यात आल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले, ज्या देशाने कंगनाला पुरस्कार दिले आहेत. त्याच कंगनाने देशाचा अपमान केला आहे. संबंध देशातून आता कंगनाला देण्यात आलेले सर्व पुरस्कार हे घेण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आलं आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असुन या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर दुसरे ट्विट करीत त्यांनी लिहिले कि, कंगनाच्या सौदंर्या समोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारे मोदी व महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजून पर्यंत का गप्प आहेत?

राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते. तर दुसरे ट्विट करीत त्यांनी लिहिले कि, देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे.

गृहनिर्माण कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले कि, 1947 साली स्वातंत्र्य नाही भीक मिळाली होती …. 2014 साली स्वातंत्र्य मिळाले …..- ह्याला फक्त मूर्खपणा म्हणता येईल

तर भाजप नेते वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, कधी महात्मा गांधींच्या त्याग आणि तपश्चर्याचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांपर्यंतच्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा अवमान. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?

त्याच झालं असं कि, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. १९४७ मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळालं आहे.’ यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात’. यानंतर यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. मात्र, आता टाळ्यांच्या गडगडाटानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकांचा पाऊस पाहायला मिळतोय.