Take a fresh look at your lifestyle.

मला तुझी माफी मागायची आहे क्रिस..; OSCAR’मधल्या प्रकारानंतर विल स्मिथचा माफीनामा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने सृष्टीतील अत्यंत नामांकित असा यंदाचा ९४ वा ऑस्कर पुरस्कार २७ मार्च २०२२ रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात बडे बडे लोक उपस्थित होते. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरचा परिसर ऑस्कर विजेते आणि नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने भरून गेला होता. दरम्यान या सोहळ्यात एक मोठी घटना झाली. किंग रिचर्ड साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावलेला अभिनेता विल स्मिथने निवेदक क्रिस रॉकला कानाखाली मारली आणि सारेच निशब्द झाले. भावनेच्या ओघात जे झालं ते झालं पण खजील होत आता अभिनेता विल स्मिथने सोशल मीडियाद्वारे क्रिसची जाहीर माफी मागितली आहे.

अभिनेता विल स्मिथ याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर माफीनाम्याची पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिले कि, कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. माझ्या खर्चावर विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे असं मी समजू शकतो. परंतु जेडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही आणि भावनेच्या अधीन झाल्याने मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे क्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलो. या प्रेमळ जगात हिंसेला स्थान नाही. मी अकॅडमी, शोचे निर्माते, सर्व उपस्थित पाहुणे आणि जगभरातील प्रेक्षकांची माफी मागतो. मी विलियम्स आणि माझ्या किंग रिचर्डच्या कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्या या वागण्यामुळे त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय”.

त्याचे झाले असे कि, ऑस्कर सोहळ्याचा निवेदक क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. क्रिसने G.I. Jane सिनेमावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली. तो म्हणाला कि, ‘G.I. Jane सिनेमात जेडाला टक्कल असल्यामुळे घेतलं होतं. पण खरंतर जेडाने सिनेमासाठी टक्कल केलं नसून, तिला एक आजार आहे. त्या आजाराचं नाव आहे Alopecia. यामुळे तिचे केस सतत गळत असतात. म्हणून जेडाने स्वतःचे केस स्वतःच कापले आहेत. दरम्यान, पत्नीवर विनोद केल्यामुळे स्मिथ चिडला आणि त्याने शिविगाळ करत होस्ट क्रिसच्या कानशिलात लगावली.

 

सोमवारी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने विलच्या या कृतीचा निषेध केला आणि क्रिसला कानाखाली मारल्याबद्दल चौकशी सुरू केली. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने रविवारी सांगितलं की त्यांना या घटनेची माहिती होती परंतु त्याविषयी ते तपास करू शकत नाही, कारण प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने पोलिस तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.