चोरीचं सत्र संपणार..? बहुप्रतीक्षित ‘मनी हाईस्ट 5’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेटफ्लिक्सची अत्यंत लोकप्रिय वेबसीरीज ‘मनी हाईस्ट’चा ५ वा सीजन कधी येणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ही वेब सीरीज स्पॅनिश असूनही जगभर पसंत केली गेली आहे आणि आता या सीरीजचा बहुप्रतीक्षित ५ वा सीजन लवकरच येणार आहे. नुकताच याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीलाच टोकियोला साखळीने बांधलेले दिसते. यानंतर एक सीन येतो जेव्हा इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएरा प्रोफेसरला पकडतात. तर दुसरीकडे, प्रोफेसर पकडला गेल्यावर रॅकेल या टीमचे नेतृत्व करीत हे मिशन सुरु ठेवते. हा ट्रेलर प्रचंड थरारक आहे. यात पोलीस आणि प्रोफेसरच्या टीममध्ये होणारी चुरशीची लढत प्रेक्षकांना खिळवून ठेवणार हे दिसतेय. या ट्रेलरच्या शेवटी असे लिहिले आहे की, ‘नेहमी लढा आणि कधीही ‘आत्मसमर्पण हा पर्याय नाही!’
‘मनी हाईस्ट’ या सीरीजचा ५वा सीझन खूप थरारक आणि तितकाच महत्वाचा आहे. कारण हा सीजन या सीरिजचा शेवटचा भाग असेल आणि प्रोफेसर हा शेवटचा डाव जिंकणार का? हे कळणार आहे. शिवाय ट्रेलर पाहून हे समजते कि, हा सीझन खूप रंजक व चित्तथरारक आहे. त्यामुळे ट्रेलर रीलीज होताच चाहते सीरीज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याआधी सीरीजचा टीझर रिलीज केलेला ज्यात प्रोफेसरला इन्स्पेक्टर अॅलिसिया सिएराने पकडले होते. हे पाहून, चाहत्यांची उत्सुकता चांगलीच ताणली आहे.
विशेष म्हणजे, हा ५ वा सीझन २ भागांमध्ये विभागला जाईल. यातील पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१, तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. Abserver.com च्या अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे या सीरीजला खूप फायदा झाला आहे. तो असा कि, लॉकडाऊन दरम्यान ‘मनी हाईस्ट’चा तिसरा आणि चौथा सिझन प्रदर्शित झाला होता. त्यामुळे अनेकजण निवांत असल्यामुळे ओटीटीवर हि सीरीज अधिक पाहिली गेली. कारण थिएटर बंद होते. प्रेक्षकांनी ही सिरीज पाहिली आणि त्यांना ती खूप आवडली. त्यामुळे कोरोना काळादरम्यान सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरीजमध्ये ‘मनी हाईस्ट’चा समावेश आहे.