तुमच्या व्हॅकेशनचे फोटो तुमच्याजवळ ठेवा; व्हॅकेशनचे फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर शोभा डे बरसल्या
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरी राहण्याचे संदेश देताना दिसत आहेत. स्वतः मात्र मालदीव, गोवा यांसारख्या ठिकाणी व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. इतकेच नव्हे तर एन्जॉय करतानाचे फोटो, व्हिडीओ सर्रास आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. यावर सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी या सेलिब्रिटींना चांगलेच फैलावर घेतले आहे. शोभा डे यांनी रोहिणी अय्यर यांनी लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे आणि या सेलिब्रिटींचा समाचार घेतला आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे कि, ‘स्वत:चे फोटो शेअर करणे असभ्यपणा आहे. तुम्ही नशीबवान आहात की, या कठीण काळात तुम्हाला ब्रेक मिळतोय. पण सर्वांवर एक उपकार करा, हे खासगी ठेवा’.
रोहिणी अय्यर यांनी लिहिले, ‘तुम्ही सगळे मालदीव व गोव्यात अलिशान ठिकाणांवर सुट्टी घालवत आहात. पण लक्षात ठेवा, ही सुट्टी तुमच्यासाठी आहे. भयंकर महामारीचा काळ आहे. अशास्थिीत इतके असंवेदनशील, मूर्ख बनू नका आणि स्वत:च्या प्रिव्हिलेज्ड लाईफचे फोटो शेअर करू नका. असे फोटो शेअर करून तुम्ही अक्कलशून्यच नाही तर पूर्णपणे आंधळे आणि बहिरे दिसत आहात. ही वेळ इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्याची नाही तर मदत करण्याची आहे. काही करू शकत नसाल तर किमान घरी राहा किंवा हॉलिडे होममध्ये शांत बसा. मास्क लावा, फोटो काढून शेअर करू नका. हा फॅशन वीक वा किंगफिशर कॅलेंडरचा काळ नाही…’
सध्या बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी विविध ठिकाणी व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. कुणी मालदीवमध्ये तर कुणी गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. आलिया भट, रणबीर कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, टायगर श्रॉफ, दिशा पटनी, पूजा बेदी हे सगळे मालदीवमध्ये आहेत. तर काहीजण मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतले आहेत. यात श्रद्धा कपूरचा समावेश आहे.