राग येतो ,वाईट वाटते, त्रास होतो..; प्रेक्षकांचा द्वेष पाहून अभिनेता मिलिंद गवळींचे दुखावले मन
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका एका अनोख्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा होणार होता. मात्र अंकिताने सुसाईडचा प्रयत्न केल्यामुळे अभिषेक साखरपुडा सोडून अंकिताकडे मुंबईला जातो. दरम्यान नवीन प्रोमोत दाखविल्याप्रमाणे अभिषेक घरी परततो तेव्हा तो अंकिताशी लग्न करून येतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षक अतिशय नाराज झाले आहेत. परिणामी हे प्रेक्षक सोशल मीडियावर अभिषेकची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी याला नको नको त्या शब्दात अद्वा तद्वा बोलत आहेत. याबाबत मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर निरंजनसोबतचे फोटो शेअर करत हि पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, निरंजन कुलकर्णी म्हणजेच “आई कुठे काय करते” चा डॉक्टर अभिषेक देशमुख ,सध्या अंकिताशी लग्न करून आल्यामुळे असंख्य लोक अभिषेक देशमुखला अक्षरशः शिव्या घालत आहेत, काल रात्री त्यांनी मला इंस्टा पोस्टवर लोकांनी ज्या शिव्या दिल्या त्या वाचून दाखवल्या, काय गंमत आहे बघा, मागच्या महिन्यात त्यांनी मला काही व्हिडिओ दाखवले होते त्यात अभिषेक देशमुखला हॉस्पिटलमध्ये पेशंटचे नातेवाईक मारतात ते बघून लहान मुलं “अभीला का मारतात” नका मारू त्याला, दुसरी पोस्ट होती “अभी ला हात लावला आता तुला सोडत नाही” खूप प्रेमाचे मायेचे कमेंट्स त्यांनी मला दाखवले होते.
पुढे, आज अभिषेक देशमुखसाठी नाही निरंजन कुलकर्णी याच्यासाठी मला काहीतरी लिहावसं वाटलं, तीन वर्षांपूर्वी कलावंत स्टुडिओमध्ये “तू अशी जवळी रहा” या मालिकेत माझ्या मुलाचा रोल करण्यासाठी एक गोरागोमटा, गोंडस, त्याचे डोळे खूप बोलके, असा मुलगा माझ्या मेकअप रूम मध्ये आला क्षणात आमची गट्टी झाली, खोडकर मस्तीखोर, मिश्किल, हसमुख. जवळजवळ दोन वर्ष आम्ही एकच मेकअपरूम शेअर केले एकत्र जेवायचं ,गप्पा मारायच्या, हसत खेळत मजेत शूटिंग करायच, मी एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो, हा मुलगा रात्रभर तिथे थांबला, दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंग होतं पण तरीही थांबला.
पुढे, दीड वर्षापूर्वी आम्ही परत बाप लेक म्हणून “आई कुठे काय करते”मध्ये हे एकत्र आलो. त्याच्याशी एक वेगळं नातं नकळत जुळत गेलं ,अतिशय प्रेमळ त्याचे आई वडील जे अंबरनाथला असतात, मी आणि माझी बायको एकदा त्यांच्या घरी गेलो होतो तर आमचा खूपच पाहुणचार केला. निरंजनमध्ये त्याच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत. आता हे लिहिण्यामागचं कारण असं, जेव्हा एक कलाकार एखादा रोल करतो, त्यावेळी रोल प्रमाणे त्याला लोकांच्या प्रतिक्रिया मिळत असतात, ज्यावेळेला निरंजनने ज्ञानेश्वर ,श्रीकृष्ण, विष्णू, यांच्या भूमिका केल्या त्याला कौतुकाचे वर्षाव झाले आणि आता डॉक्टर अभिषेक देशमुख अंकिताशी लग्न करून येतो आणि अनघाला सोडून देतो त्या वेळेला त्याला शिव्याशाप मिळतात, निरंतन एक उत्तम कलाकार आहे तो जसं कौतुक स्वीकारतो तसेच तो तिरस्कार देखील स्वीकारतो. पण मला खूप दु:ख होत आहे.
अनिरुद्ध देशमुख म्हणून मला शिव्या बसल्या त्याचं मला काही वाटत नाही, मी हसत हसत मीम्स पण स्वतः शेअर करतो.पण मिलिंद गवळी म्हणून निरंजन कुलकर्णीला द्वेष करणारे पाठवतात त्या वेळेला राग येतो ,वाईट वाटते, त्रास होतो, एका उत्तम कलाकाराच्या पालकाच्या, आई वडीलच्या वेदना खूप कमी लोक समजू शकतात, त्याला कोणी वाईट बोललेले सहन होत नाही, असे मिलिंद गवळीने पोस्टमध्ये म्हटले आहे.