Take a fresh look at your lifestyle.

किरण मानेंनी राजकारणात प्रवेश करावा- अभिनेत्री दीपाली सय्यद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच मराठी अभिनेते किरण माने याना मालिकेतून काढून टाकल्यामुळे एक वाद निर्माण झाला होता. आता या वादाने विश्रांती घेतली असली तरी आठवडाभर हा वाद ज्वालामुखीसारखा उसळत होता. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील विलास पाटील हे पात्र माने साकारत होते. या पात्राला प्रेक्षकांची पसंती असूनही मानेंची मालिकेतून केलेली हकालपट्टी हे या वादाचे कारण ठरले. दरम्यान आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकले असा आरोप मानेंनी प्रोडक्शनवर केला होता. यानंतर अनेक राजकीय पक्षांनी यात उड्या घेतल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतुन काढून टाकले. त्यामुळे हा वाद उफाळला. एकीकडे मानेंनी सांगितले कि, आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळे आपल्याला मालिकेतून काढले तर दुसरीकडे त्यांच्या वर्तनावर गंभीर आरोप झाले.

या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांना माध्यमांनी काही संबंधित प्रश्न विचारले. यावर त्यांनी किरण माने यांना राजकारण प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. दीपाली यांनी दिलेला सल्ला आता किरण माने ऐकतात का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान दीपाली सय्यद बोलताना म्हणाल्या कि, एखाद्या व्यक्तीने कोणतीही भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे आणि त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या बाहेर पसरवणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुळात किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. आपले मुद्दे मांडण्याची कला त्यांना अवगत आहे.

त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे. दरम्यान, मालिकेतून बाहेर काढल्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार साहेब आपल्याला न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.