Take a fresh look at your lifestyle.

अक्षयचा ‘रक्षा बंधन’ आणि आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ आमने सामने; कोण घेईल माघार..?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या २ वर्षांपासून सर्व इंडस्ट्रीने कोरोनामुळे खूप नुकसान सहन केले आहे. यानंतर आता कोरोना महामारीची तीव्रता कमी होताना पाहून सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. मात्र ५०% क्षमतेने. पण कसे का होईना काम सुरु झाल्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखा एकामागे एक नाहीतर मग एकाच दिवशी घोषित करण्यात आल्या आहेत. काही निर्मात्यांनी दुसरा सिनेमा क्लॅश होतोय पाहून माघार घेतली पण काही निर्मात्यांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. यात आता अक्षय कुमार आणि आमिर खान यांचे रक्षा बंधन आणि लाल सिंग चड्ढा हे सिनेमे एकमेकांना टक्कर देणार असे दिसून येत आहे.

याआधी शाहिद कपूरचा ‘जर्सी’ आणि ‘KGF Chapter 2’ हा सर्वात मोठा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी क्लॅश करतोय अशी बातमी समोर आली होती. यानंतर आता आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हे दोन्ही मोठे सिनेमे ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे हा या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा क्लॅश असेल असे सांगितले जात आहे. अक्षय कुमार आजकाल बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसतोय. कारण अक्कीचे सिनेमे आले कि मग बाकीच्यांचे रेकॉर्ड पण मोडीत जाणार हे नक्की. पण आमिर खान देखील तगडीचा आहे. त्यामुळे ही टक्कर जोरदार होणार यात काही वादच नाही.

याबाबतची माहिती प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’सोबत रिलीज होणार आहे.

‘रक्षा बंधन’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा कोणताही विचार केलेला नाही. शिवाय तरण आदर्श यांनी असेही म्हटले आहे की, आमिरचा चित्रपट कोणाबरोबर क्लॅश करत नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण जसजशी समीकरणे तयार होत आहेत, तसतसा हा चित्रपट इतर कोणत्या चित्रपटासोबत क्लॅश न करण्याची शक्यता कमी झाली आहे.