हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरात नुसता आनंदी आनंद झाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले असून याबाबत राजकीय विश्वातूनदेखील प्रतिक्रिया आल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी म्हणून अमोल कोल्हे कार्यरत होते आणि अखेर आता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. मात्र या विजयचे संपूर्ण श्रेय त्यांनी तमाम बैलगाडा मालकांना समर्पित केले आहे. त्यांची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू झाल्याबद्दल यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आजच्या विजयाचं संपूर्ण श्रेय जातं ते ऐन बंदीच्या काळातही आपल्या बैलांना पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावणाऱ्या तमाम बैलगाडा मालकांना! सर्व बैलगाडा मालक, शौकीन व शेतकऱ्यांचे अभिनंदन व शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार!’
याशिवाय आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी २०१९ सालापासूनचे काही व्हिडीओ एकत्र शेअर केले आहेत. यातील काही संसदेतील तर काही सभेतील व्हिडीओ आहेत. या व्हिडिओसोबत अमोल कोल्हे यांनी लिहिलंय कि, ‘दसरा- दिवाळीसारखाच आनंदाचा दिवस! बैलगाडा शर्यती सुरू करण्याकामी मला खारीचा वाटा उचलता आला, हे माझं भाग्यच! आज बळीराजा, बैलगाडा मालक व शौकिनांनी दाखविलेल्या ऋणातून उतराई झाल्याची भावना सुखावणारी आहे. मी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा घटनाक्रम आपल्यासोबत शेअर करतोय!’. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता पुन्हा एकदा घाटात भिर्रर्र हा आवाज अबाधित घुमण्यासाठी सज्ज झाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक आनंद ग्रामीण भागात साजरा केला जात आहे.
Discussion about this post