चित्रप्रवास | आपल्याला माहित आहे की, राजा हरिश्चंद्र हा १९१३ मध्ये दादासाहेब फाळकेंनी आणलेला पहिला मराठी सिनेमा. मात्र तो मूकपट होता. पण आजपासून ८८ वर्षांपूर्वी म्हणजेच ६ फेब्रुवारी १९३२ या दिवशी चित्रपट महर्षी व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा हा सिनेमा मुंबईत प्रदर्शित झाला होता.
‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट प्रसिद्ध होऊन आज ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. व्ही शांताराम यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. हा सिनेमा आजही सिनेसृष्टीतला मैलाचा दगड मानला जातो. कारण मराठी सिनेमा पहिल्यांदाच या निमित्ताने बोलका झाला.
८८ वर्षे जुन्या या चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या पुराणकथेवर आधारलेली होती. कथाभाग पौराणिक असल्याने बराचसा कथाभाग हा गाण्यांमधून पुढे सरकतो. या सिनेमात पंधरा गाणी होती. गाण्यांच्या तुलनेत सिनेमात संवाद कमी होते.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रभात या व्ही. शांतारामांच्या कंपनीने इतरही सिनेमांची निर्मिती केली. प्रभात आणि व्ही शांताराम यांनी सिनेमासाठी दिलेलं योगदान हे अनन्यसाधारण आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बोलपटाला आज ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. सिनेमाची दुनिया म्हणजे स्वप्नांची दुनिया असं म्हटलं जातं. तर अशा या स्वप्नांच्या दुनियेतल्या एका दिव्यस्वप्नाची आठवण दरवर्षी येत राहील.