Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना निमोनियाची लागण; हिंदुजा रुग्णालयात केले दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना निमोनियाची लागण झाल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना मुंबईतील खार येथे असणाऱ्या हिंदुजा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर येत आहे. असे समजते आहे की, त्यांना निमोनिया झाला असून त्यांच्या फुफ्फुसात पॅचदेखील मिळाला आहे. यामुळे सध्या उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयामध्ये त्यांच्या सोबत त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह आणि मुले आहेत.

 

बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून नसीरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना न्युमोनिया झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसात पॅच दिसला असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचाराचा परिणाम होत आहे.

अलीकडेच काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांची तब्येत ठीक नसल्याचे वृत्त वारंवार समोर येत होते. मात्र ती निव्वळ अफवा होती. यानंतर हे वृत्त देखील खोटे असेल अशी शंका अनेकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. परंतु यावेळचे हे वृत्त खात्रीच्या सूत्रांकडून मिळाले असल्यामुळे हे खरे असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे हि सद्यःपरिस्थिती आहे. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी १९७५ साली ‘निशांत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर १००हून अधिक चित्रपटात ते झळकले. यामुळे त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. या वृत्तानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, यातील दिलासादायक बाब अशी कि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.