Take a fresh look at your lifestyle.

विशाल दादलानीने पुन्हा साधला भाजपावर निशाणा,म्हणाला “काय साहेब… ”

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड संगीत दिग्दर्शक आणि गायक विशाल दादलानी याने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने शनिवारी महाराष्ट्र सरकारकडे औरंगाबादचं नाव बदलावे यासाठी मागणी केली. भाजपाने औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे. या वरुनच विशालने भाजपावर निशाणा साधत सत्ता जाताच यांनी सर्कस सुरु केल्याचा टोला लगावला आहे.

विशाल दादलानीने ट्विट करत म्हटलं आहे की, “पाच वर्ष यांचे सरकार होते तेव्हा तर नाव बदललं नाही. आणि आता सत्तेतून बाहेर येताच यांची सर्कस सुरु झाली आहे. काय साहेब…लोक मूर्ख वाटले का?”.

आम्ही औरंगजेबाचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “औरंगाबादच्या नामकरणा संदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचं नाव बदलले गेले पाहिजे.आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”.