Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता डिनो मोरियासह मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अन्य तिघांवर EDची कारवाई; कोट्यवधींची संपत्ती जप्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सक्‍तवसुली संचालनालयाने (ED – Enforcement Directorate) अभिनेत्री यामी गौतम हिला चौकशीसाठी नुकतेच दुसरे समन्स बजावले असल्याची घटना अद्याप जुनी देखील झाली नाही तोच आज अभिनेता डिनो मोरियावर मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात EDची कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासोबत, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, संजय खान आणि डीजे अकील यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात EDने या चारही जणांवर कारवाई केली आहे. यात EDने तब्बल सव्वा कोटींची संपत्ती जप्त केली आहे आणि संदर्भातील माहिती अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.

पीएमएलए कायद्याअंतर्गत या चौघांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याचे EDने सांगितले. संपत्तीची एकूण किंमत ८.७९ कोटी असल्याचे ED कडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यात मालमत्ता, ३ वाहने, बँक अकाऊंट्स व शेअर्स/म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीपैकी ३ कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. तर डिनो मोरियाची १.४ कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि डिजे अकील नावाने प्रसिद्ध असणाऱ्या अकील अब्दुल खलील बचू अलीची संपत्ती १.९८ कोटी इतके रुपये आहे. शिवाय अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची २. ४१ कोटी रुपयांची संपत्ती यात समाविष्ट आहे.

स्टर्लिंग बायोटेक बँकेची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याची माहिती उघड झाली आहे आहे. पैशांच्या अफरातफरीचे हे प्रकरण १४ हजार ५०० कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. कोट्यवधी रुपयांचे बँक घोटाळ्यातील आरोपी आणि गुजरातचे बिजनेसमन संदेसरा बंधु यांच्यासोबत संबंधितांचे कनेक्शन असल्याचे EDच्या तपासात उघड झाले आहे. EDने म्हटले की, “स्टर्लिंग बायोटेक समूहाचे फरार प्रवर्तक नितीन संदेसरा आणि चेतन संदेसरा यांनी आपल्या गुन्ह्यातून लुबाडले धन या चौघांना दिले. प्रवर्तक बंधु नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, चेतनची पत्नी दिप्ती संदेसरा आणि हितेश पटेल यांना एका विशेष कोर्टाने फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले आहे.