Take a fresh look at your lifestyle.

‘याद आ रहा है.. ‘; बप्पी लहरींच्या निधनावर कला ते क्रिडा अशा सर्व स्तरातून शोक व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील गोल्डन मॅन आणि पॉप संगीताचा आवाज बप्पी लहरी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी बप्पी दा यांना देवाज्ञा झाली. दरम्यान त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. बप्पी दा यांच्या निधनाने संगीत सृष्टीशिवाय, बॉलिवूड सिनेसृष्टी आणि इतर प्रत्येक इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे. एका युगाचा अस्त झाल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान सामान्य चाहत्यांसोबत बॉलिवूड अभिनेते, राजकारणी, मराठी कलाकार, क्रिकेटपटू आणि अन्य विविध स्तरांतून बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पाहुयात ट्विट्स खालीलप्रमाणे:-

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून बप्पी दा यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले कि, दिग्गज गायक आणि संगीतकार, बप्पी लहिरीजी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि जिवंत स्वभावासाठी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी यांचे निधन झाले. बप्पीदा यांनी आपल्या विशिष्ट शैलीने रसिकांना आपल्या संगीतावर ठेका धरायला लावले. त्यांच्या रुपाने संगीतक्षेत्राचा एक तारा निखळला. भावपूर्ण श्रद्धांजली.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन यानेही बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट करीत लिहिले कि, बप्पी दा यांच्या संगीताला एक धार होती. चलते चलते, सुरक्षा आणि डिस्को डान्सरसह त्यांनी हिंदी चित्रपट संगीताला अधिक समकालीन शैलीची ओळख करून दिली आहे. ओम शांती दादा. तुमची आठवण नेहमीच येईल.

मराठी संगीतकार आणि गायक सलील कुलकर्णी यांनी देखील बप्पी दा याना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करीत लिहिले कि, अत्यंत दुःखद बातमी !! बप्पी दा आम्हा सर्वांना सोडून गेले. “याद आ रहा है तेरा प्यार”

भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहताना ट्विट केले आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले कि, मला बप्पी दाचे संगीत खूप आवडते. विशेषत: “याद आ रहा है” – हे ड्रेसिंग रूममध्ये अनेकदा ऐकले. त्यांच्या प्रतिभेची श्रेणी खरोखरच आश्चर्यकारक होती. आप हमेशा हमें याद रहोगे बप्पी दा!