Take a fresh look at your lifestyle.

‘लाल सिंग चढ्ढा’च्या टीमवर शूटिंगदरम्यान प्रदूषण केल्याचा स्थानिकांकडून आरोप; व्हिडीओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग लडाखमध्ये सुरु असून सर्व टीम लडाखमध्ये आहे. या टिममध्ये आमिरची पूर्व पत्नी किरण रावदेखील सामील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमवर लडाखमध्ये चित्रीकरणादरम्यान प्रदूषण पसरवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाची टीम या सध्या शेवटच्या शेड्युलनुसार शुटिंग करत आहे. अशा परिस्थितीत लडाखचे काही खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आहेत. ज्यात चित्रपटाची टीम कचरा पसरवताना दिसली आहे.

सोशल मीडिया ट्विटरवर लडाखमधील वाखा गावाजवळचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये यूझर्सने दाखवून दिले आहे की, चित्रपटाची टीम या सेटच्या सभोवताली कचऱ्याचे ढीग तयार करत आहे. जेथे कचर्‍यातील विविध वस्तू आणि प्लास्टिकच्या अनेक बाटल्या ठिकठिकाणी फेकल्या गेल्या आहेत. यामुळे हा व्हिडिओ पाहून स्पष्ट होत आहे की, चित्रपटाची टीम लडाखमध्ये प्रदूषण पसरवित आहे. हा व्हिडिओ एका यूझरने पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमिर खानच्या आगामी चित्रपटाच्या टीमने वाखा येथे राहणाऱ्या गावकऱ्यांना दिलेली ही विशेष भेट आहे.”

इतकेच नव्हे तर पुढे त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वत: आमिर खान सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण स्वच्छ करण्याविषयी मोठी चर्चा करताना दिसतो आणि जेव्हा ते स्वतःवर येते तेव्हा तेच ते पाहायला मिळते.” आमिर खानची टीम ४५ दिवसीय लांबीच्या वेळापत्रकात आली आहे. यामुळे हे सर्व पाहून येथील ग्रामस्थ निराश झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोकांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर, बरेच युझर्स याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

प्रसिद्ध तेलुगु अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत दिसणार आहे. मुख्य म्हणजे, नागा चैतन्य या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ज्यामुळे प्रेक्षक या नव्या एन्ट्रीबद्दल उत्सुक आहेत. आमिरसोबत करीना कपूर खानदेखील या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच चित्रपटाचे शूटिंग संपेल आणि हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी आशा आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ज्यामुळे आमिर खानच्या संपूर्ण टीमला या चित्रपटाकडून फार आशा आहेत.